– सविताताई मुंडेंचा थेट प्रकाश आंबेडकरांना फोन; जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची आंबेडकरांची ग्वाही!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील दुसरबीड येथील शासकीय ई-क्लास जमीन ही वंजारी समाजाच्या स्मशानभूमीसाठी वहिवाटीने दिली गेलेली असतानादेखील या जमिनीचे बनावट दस्तावेज बनवून ही जागा एका खासगी संस्थेने ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून बळकविण्याचा प्रयत्न चालवला आहे. ही जागा वंजारी समाजाला मिळावी, या मागणीसाठी समाजाच्यावतीने सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या उपोषणस्थळी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार तोताराम कायंदे, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविताताई मुंडे, शिवराज कायंदे, प्रभाकर ताठे आदींसह विविध मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. याप्रसंगी सविताताईंनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनादेखील फोन लावून त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. तर आंबेडकरांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
दुसरबीड येथे वंजारी समाजाची स्मशानभूमीची जागा एका संस्थेने बळकविण्याचा घाट घातलेला आहे. या जागेबाबत देशमुख समाज हा ही जागा आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वडिल स्व. भास्करराव शिंगणे यांच्या नावाने प्रस्तावित असलेल्या क्रीडा संकुलासाठी राखीव असल्याचा दावा करत आहे. तसेच, याबाबतचा वाद कोर्टात चालू असल्याचेही सांगत आहे. परंतु, वहिवाटीने ही जागा वंजारी समाजाची असून, या जागेबाबत बनावट दस्त तयार करण्यात आल्याचा वंजारी समाजाचा आरोप आहे. ही जागा परत मिळावी, यासाठी वंजारी समाजाच्यावतीने सिंदखेडराजा तहसीलसमोर २३ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या उपोषणाला आज (दि.२४) भाजपचे नेते तथा माजी आमदार तोताराम कायंदे, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविताताई मुंडे, शिवराज कायंदे, प्रभाकर ताठे, संविधान मुंडे आदींनी भेट दिली व उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. सविताताई मुंडे यांनी तर थेट प्रकाश आंबेडकर यांना फोन लावला व हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. आंबेडकरांनीदेखील बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी या नेत्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. तसेच, ही जागा वंजारी समाजाला परत मिळावी, अशी मागणी केली. याप्रसंगी गणेशराव देशमुख, संदीप देशमुख, संविधान मुंडे आदींचीदेखील प्रामुख्याने उपस्थिती होती. ही जागा वंजारी समाजाला परत मिळाली नाही, तर त्याचा सर्वात मोठा फटका आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात असून, याप्रश्नी वंजारी समाजाच्या भावना संतप्त आहेत.
——
दुसरबीड येथे वंजारी समाजाच्या स्मशानभूमीची जमीन हडपण्याचा डाव; समाज बांधवांचे तहसीलसमोर आमरण उपोषण