DEULGAONRAJAHead linesSINDKHEDRAJA
वाकद जहागीर येथे निकृष्टदर्जाची कामे, माजी सरपंचांचे गुरूवारपासून आमरण उपोषण
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील केशव शिवनी -वाकद जहागीर या गट ग्रामपंचायतीमध्ये वाकद येथील अंतर्गत पाईपलाईन, शोष खड्डे आणि पंधरावा वित्त आयोगाची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, या कामांसंदर्भात तात्काळ चौकशी करावी, या मागणीसाठी माजी सरपंच अरुण घेवंदे यांनी गुरूवार (दि.२५) पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना दिला आहे. यानिमित्ताने गावातील निकृष्टदर्जाच्या कामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
घेवंदे यांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की वाकद जहागीर येथील अंतर्गत पाईपलाईनचे काम निकृष्टदर्जाचे झाले असून, त्या कामाचे एमबी बोगस केली आहे. गावामध्ये जे शोष खड्डे खोदलेले आहेत, ते चुकीच्या ठिकाणी खोदले असल्याने गावात घाण सांडपाणी रस्त्यावरून वाहते आहे. तसेच पंधरा वित्त आयोगातील निधी मुरूम टाकणे तसेच आणि अंगणवाडी दुरुस्तीसाठी दाखवून त्यातील निधी हडप केला गेला आहे. अंगणवाडी थातूरमातूर दुरुस्ती केली आणि मुरूम न टाकताच पैसे काढले असल्यास आरोप करत, या कामाची तात्काळ चौकशी करावी, यासंदर्भात अनेक मागणीदेखील केली आहे, मात्र अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नसल्याने अखेरशेवटी माजी सरपंच अरुण घेवंदे यांनी दिनांक २५ जानेवारीपासून सिंदखेडराजा येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.