बुलढाण्याची उमेदवारी तुपकरांना; जिल्ह्यात येवूनही राजू शेट्टींनी भेट मात्र टाळली!
– महायुती व महाआघाडीशी जुळवून घेण्यास राजू शेट्टींचा साफ नकार!
– ‘स्वाभिमानी’तूनच रविकांत तुपकरांचे पंख छाटण्याचा नियोजनबध्द प्रयत्न?; लोकसभेचा किल्ला सर करणार?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीचे पड़घम वाजायला सुरूवात झाली असून, सर्वच पक्ष आघाडी, युतीच्या कामात गुंतले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मात्र एकला चलो रे ची घोषणा केली आहे. ‘स्वाभिमानी’कड़ून बुलढाणा लोकसभेची उमेदवारी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जाहीरही करून टाकली गेली. असे असताना जिल्ह्यात येवूनही राजू शेट्टी यांनी मात्र तुपकर यांची भेट टाळली. त्यांच्या सोयाबीन-कापूसप्रश्नी रेल्वे रोको आंदोलनाला साधी भेटही शेट्टी यांनी दिली नाही. दुसरीकडे, घाटाखालील शेतकरी नेते प्रशांत ड़िक्करांच्या आत्मक्लेश यात्रेच्या समारोपाला मात्र पूर्णवेळ हजेरी लावली. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच रविकांत तुपकरांच्या स्वाभिमानी बाण्याला नख लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याच्या शंकेला वाव मिळत असून, यामुळे विशेषतः संघटीत नसलेल्या शेतकर्यांच्या भरवशावर रविकांत तुपकर लोकसभेचा किल्ला सर कसा करणार? अशीही चर्चा होवू लागली आहे.
लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी एप्रिल, मे महिन्यात निवड़णूक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आपापल्या सोयीनुसार युत्या, आघाड्यांकडे प्रमुख पक्षाचा कल दिसत असून, ‘शीट शेअरिंग’च्या कामात नेते गुंतले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही याबाबत ऑफर असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी मात्र महायुती व आघाडीवर खापर फोड़त एकला चलो रे भूमिका घेतल्याचे सध्यातरी दिसत आहे. त्यांनी हातकणंगलेमधून स्वतःची व बुलढाण्यातून शेतकर्यांचे लढवय्ये नेते रविकांत तुपकर यांची उमेदवारीही जाहीर करून टाकली आहे. रविकांत तुपकर हे शेतकर्यांच्या विविध मागण्या घेऊन कायम रस्त्यावर असतात. त्यांचे आंदोलन शेतकर्यांच्या पदरात काही ना काही पाड़त आले आहे. त्यामुळे शेतकरीही सहाजीकच त्यांच्या आंदोलनात पदरमोड़ करून मोठ्या संख्येने सहभागी होतात. गेल्यावर्षीच्या त्यांच्या आंदोलनामुळेच दोनशे कोटी रुपयांच्यावर पीकविमा शेतकर्यांना मिळाला. यावर्षीही अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यांची भरपाई द्यावी, सोयाबीन, कापसाला भाववाढ द्यावी, येलोमोझॅक व बोंड़अळीमुळे नुकसानीची मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १९ जानेवारीरोजी मलकापूर येथे रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उड़ाली व त्यांना आंदोलनापूर्वीच अटकही करण्यात आली. योगायोगाने माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी जिल्ह्यात असूनही रेल्वे रोको आंदोलनात सहभागी झाले नाहीत, की रविकांत तुपकर यांची साधी भेटही घेण्याचे त्यांनी टाळले. उलट रविकांत तुपकरांचे आंदोलनच ‘मॅनेज’ असल्याचा गंभीर आरोप केला. याला रविकांत तुपकर यांनीही सड़ेतोड़ उत्तर दिले, हा भाग वेगळा.
दुसरीकडे, युवा आघाड़ी स्वाभिमानीचे नेते प्रशांत ड़िक्करांच्या जळगाव जामोद मतदारसंघातील पायी आत्मक्लेश आंदोलन समारोप कार्यक्रमाला मात्र राजू शेट्टी यांनी पूर्णवेळ हजेरी लावली. यावरून रविकांत तुपकरांचे संघटनेतूनच पंख छाटण्याचे पध्दतशीरपणे प्रयत्न सुरू असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे. या माध्यमातून तुपकरांना एकाकी पाड़ण्याचा तर मनसुबा नाही ना? अशी शंका आपसूकच व्यक्त केली जात आहे. असेच असेल तर युती, आघाड़ीविना संघटीत नसलेल्या शेतकर्यांच्या भरवशावर रविकांत तुपकर हे लोकसभेचा किल्ला सर कसा करणार, असाही प्रश्न सहाजिकच निर्माण होत आहे. याबाबत आता तुपकरांनीही सावध होत काहीतरी ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे राजकीय धुरिणांचे मत आहे. जिल्ह्यात सध्या तुपकरांची जोरदार लाट निर्माण झालेली आहे. तसेच, विविध राजकीय पक्षांच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातही तुपकर हे इतरांपेक्षा आघाडीवर आहेत. असे असले तरी त्याचे मतात रूपांतर होणे गरजेचे आहे. युत्या, आघाड्या व उमेदवार घोषीत झाले, की लोकं आपापल्या सोयीनुसार जुळत असतात, हा राजकारणातील अलिखीत नियम आहे. त्यामुळे तुपकरांनी वेळीच सावध होणेही गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
तुपकरांना निवडणूक काळात जिल्ह्याबाहेर ठेवण्याचे षडयंत्र?
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जिल्ह्यात जोरदार लाट निर्माण झालेली आहे. तसेच, विविध राजकीय पक्षांच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातही तुपकर हे प्रथम क्रमांकावर असून, त्यांची ज्यांच्याशी राजकीय लढत होण्याची शक्यता आहे, असे जिल्ह्यातील मोठे नेते हे तिसर्या क्रमांकावर आहेत. तुपकरांना आताच ब्रेक लावला गेला तर हा तिसर्या क्रमांकावरील नेता पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो. त्यासाठी तुपकरांवर दाखल गुन्ह्यांची कुंडली बाहेर काढली जाणार असून, त्या कुंडलीच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली, तसेच सत्तेचा गैरवापर करून रविकांत तुपकरांना जिल्ह्याबाहेर काढण्याचे मोठे षडयंत्र रचले जात असल्याची माहिती विश्वासनीय सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिलेली आहे. त्यामुळे तुपकरांकडून काही कायदा व सुव्यवस्थेचा गुन्हा घडतो का? याचीच सत्ताधारीवर्गातील एक गट वाट पाहात असल्याचेही हे सूत्र म्हणाले आहे.
————–