– देऊळगाव घुबे येथे जानकीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात भव्य आयोजन
देऊळगाव घुबे (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारत शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात देखील अग्रस्थानी आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांच्या कल्पकतेतुन समाजाभिमुख कार्यक्रमाचे, उदा. आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे, कवी संमेलने व साहित्य संमेलने यासारखे वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम नेहमीच राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने सन २०१७ पासून जिल्ह्यातील वा जिल्हा बाहेरील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांपैकी काही मान्यवर व्यक्तींची निवड करुन दरवर्षी पाच मान्यवरांना आदर्श जीवन पुरस्कार देवून सन्मानित केल्या जाते. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व गौरव प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सन २०२३-२४ या वर्षीच्या पुरस्कारासाठी संस्थेच्यावतीने समाजजिवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांची निवड करुन त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नामवंत मराठी व उर्दू कवि तथा लेखक व प्रख्यात निवेदक अजिम नवाज राही, छत्रपती संभाजी नगर येथील सिग्मा हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेले सुप्रसिध्द मेंदूविकार तज्ञ व शल्यचिकित्सक तज्ञ डॉ.कपिल मुळे, बुलडाणा जिल्ह्यातीलच परंतु सध्या छत्रपती संभाजी नगर येथे आंबेडकरी साहित्य चळवळीत कार्यरत असलेले झेप साहित्य संमेलनाचे उद्गाते व झेप वृत्तपत्राचे संपादक आयुष्यमान डी. एन. जाधव, बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीत मोलाचे योगदान व सामाजिक क्षेत्राशी बांधिलकी जपणार्या शरद कला महाविद्यालयाच्या अध्यक्षा सौ.सिंधूताई विष्णूपंत पाटील तसेच बुलडाणा जिल्ह्यातीलच इसरुळ येथील आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते व आदर्श शेतकरी तथा समाज सेवक श्याम पाटील भुतेकर या पाच मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
२८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता हे पुरस्कार जानकीदेवी विद्यालयाचे प्रांगणात बुलढाणा जिल्ह्याच्या जलक्रांतीचे भाग्यविधाते तथा माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्राचे माजी मंत्री व सिंदखेडराजाचे विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीचे झुंजार नेते व मुलूखमैदानी तोफ रविकांत तुपकर यांच्याहस्ते तसेच बुलढाणा जिल्ह्याचे व्यापार क्षेत्रात अग्रस्थानी असलेले दानशुर व्यक्तीमत्वाचे धनीइंदरसेठ जैन व बुलढाणा जिल्हा भाजप उपाध्यक्ष डॉ.प्रतापसिंग राजपूत व चिखली पंचायत समितीचे माजी उपसभापती उषाताई थुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे, सांगली व चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील भुतेकर, समाधान परिहार, कृष्णा मिसाळ, अमानुल्ला खासाब शेतकरी संघटनेचे नेते, पंजाबराव जावळे शिवसेना नेते, शेनफड पाटील सुरुशे माजी सरपंच मंगरूळ, डॉ.विकास मिसाळ राष्ट्रवादी नेते, प्रकाश पाटील भुतेकर माजी संचालक कृउबास चिखली, सतीश पाटील भुतेकर अध्यक्ष चिखली तालुका सरपंच संघटना, राजू पाटील जावळे राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष, भानुदास पाटील घुबे माजी उपाध्यक्ष, प्रकाश आबा घुबे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली, बाळू पाटील मिसाळ सरपंच मिसाळवाडी, दीपक पाटील घुबे माजी सरपंच, अंकुश थुटे युवा राष्ट्रवादी नेते व भांनुदास पाटील थुटे माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्रातील शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर बहुआयामी आणि जीवन भरलेले स्फोटक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक शेणफडराव घुबे व संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.