टेन्शन नाही, उद्याची सुट्टी कायम!; न्यायालयाने सुट्टीविरोधातील याचिका फेटाळली!
– ‘ही याचिका प्रसिद्धीपोटी व राजकीय हेतूने प्रेरित’, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना फटकारले; विद्यार्थी असल्याने दंड टाळला!
मुंबई (प्रतिनिधी) – अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (दि.२२) पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचार्यांना उद्या अर्ध्या दिवसाची सुट्टी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केली होती. यानंतर राज्यातील एकनाथ शिंदे सरकारनेही २२ जानेवारीला पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धार्मिक कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे, हे संविधानातील धर्मनिरपेक्षक तत्वांच्या विरोधात आहे, असा आक्षेप घेत शनिवारी ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज (रविवारी) सुट्टी असतानाही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावनीअंती ही याचिका फेटाळण्यात आली असून, न्यायालयाचा वेळ वाया घातल्याबद्दल या विद्यार्थ्यांना दंड करण्याचे मात्र न्यायालयाने याचिकाकर्ते हे विद्यार्थी असल्याने टाळले आहे.
‘धार्मिकबाबींसाठी सुट्टीची घोषणा हा निर्णय मनमानी असू शकत नाही. सुट्टीचा निर्णय धर्मनिपेक्षक तत्वांशी सुसंगत आहे. राज्यात विविध धर्मांचे पालन केले जाते. सुट्टीमुळे कलम २५ आणि कलम २६ ला कुठलीही बाधा पोहोचत नाही,’ असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे. या याचिकेवर सरकारच्यावतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तीवाद करताना म्हणाले, ‘नागरिकांना धार्मिक श्रद्धा बाळगण्याची परवानगी देणे हे धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन होते, असे म्हणता येत नाही. अन्य धर्मियांसाठीही सुट्टी जाहीर केली जाते. त्यामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे ही एक धोरणात्मक बाब आहे. न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करण्यास सांगता येत नाही.’, असे सरकार पक्षाने नमूद केले. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करत सुटी देण्यात आल्याचा आरोप याचिका करणार्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निवाड्यातील निरीक्षणांवर याचिका करणार्यांनी आक्षेपार्ह विधाने केली. दोन्ही बाजू ऐकून घेऊन न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठाने सार्वजनिक सुटीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी केलेली याचिका फेटाळली. यावेळी न्यायालयाने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना खडेबोल सुनावले आहेत. ‘राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि प्रसिद्धीपोटी ही जनहित याचिका करण्यात आल्याचे दिसत आहे. ही याचिका दाखल करताना मूलभूत तत्वांचा विचार केला नाही,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. अशा प्रकारची याचिका केल्याबद्दल आम्ही याचिकाकर्त्यांना जबर दंड लावू शकतो. पण याचिकाकर्ते हे विद्यार्थी असल्याचे लक्षात घेऊन आम्ही दंडाचा आदेश देण्याचे टाळत आहोत. भविष्यात या विद्यार्थ्यांनी व्यक्तिश: अशाप्रकारची निरर्थक आणि चुकीची याचिका करण्याची चूक करू नये, अशी सक्त ताकीद देत उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने सार्वजनिक सुटीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली.
न्यायालयीन कर्मचार्यांना उद्या सुट्टी आहे की नाही?
दरम्यान, राज्य व केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली तरी, न्यायालयाने मात्र आपल्या कर्मचार्यांना हे वृत्तलिहिपर्यंत सुट्टी जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे न्यायालयीन कर्मचार्यांना उद्या (दि.२२) सुट्टी आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. उद्याच्या सुट्टीला न्यायपीठाचा काही आक्षेप नसेल तर न्यायालयांनी आपल्या कर्मचार्यांना सुट्टी का जाहीर केली नाही? असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.
——–