नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :-सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी, वावद अंतर्गत ग्राहक सेवा केंद्र (CSC) व खतांच्या गोदामाचे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. उमेश पाटील, कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी वसंत चौधरी, विजय मोहिते, शेळके, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र दहातोंडे, वरीष्ठ शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे, ‘आत्मा’चे चंद्रकांत बागुल, सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी, वावदचे मनोज पाटील, अशोक पाटील, संतोष पाटील, श्यामराव पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राने प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना गावस्तरावर शेती हंगामात खतांची उपलब्धता, सेंद्रीय उत्पादने, सुधारित तंत्रज्ञानाची जागरुकता तसेच आपल्या परिसरात कृषी आधारित उद्योगासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न व्हावेत.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रघुवंशी यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजना व खतांची उपलब्धता शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत करावी, असे आवाहन केले.