– शिंदेंचा गट हाच खरी शिवसेना; शिंदेंना पक्षातून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही!
– विधानसभा अध्यक्षांच्या निकालाने राज्यात खळबळ!
– दोन्ही गटांच्या आमदारकीला धक्का नाही!
– देशात लोकशाहीची हत्या झाली, ठाकरे गटाची जोरदार टीका
मुंबई (खास प्रतिनिधी) – शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आजच्या निकालाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यास नकार देताना, शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला आहे. बुधवारी सायंकाळी नार्वेकरांनी आपला बहुप्रतीक्षित निकाल दिला. १२०० पानांच्या या निकालपत्राचे ठळक मुद्देच त्यांनी वाचून दाखवले. ते म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या ५५ पैकी ३७ आमदारांचे समर्थन आहे. त्यांचा गट हा खरी शिवसेना असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदेंना काढण्याचा अधिकार नाही, असेही नार्वेकर यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याने ठाकरे गट संतप्त झाला असून, देशात लोकशाहीची हत्या झाल्याची जोरदार टीका या गटाकडून झाली. तर नार्वेकरांच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी दिली आहे. शिंदे गटाची आमदारकी शाबूत राखतानाच ठाकरे गटाच्या आमदारांची आमदारकीही नार्वेकर यांनी शाबूत राखली आहे. ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरविण्यास नार्वेकर यांनी नकार दिलेला आहे.
एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. सुनील प्रभूंचा व्हीपच लागू होत नसल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही, असे नार्वेकरांनी म्हटले. बैठकीला गैरहजर राहणे हे पक्षातून हकालपट्टीचे कारण होऊ शकत नसल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवले नाही. कोणता गट हा खरा पक्ष आहे, हे ठरवण्यासाठी २०१८ ची घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही. त्यामुळेच विधीमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट हा खरी शिवसेना आहे, याचा निर्णय घेत आहे. बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहे. खरी शिवसेना कुणाची हे ठरवताना शिवसेना पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचा निकाल आणि पक्षातील बहुमत हे महत्त्वाचे आहे, असे नार्वेकर यांनी निकाल वाचनाच्या सुरूवातीलाच स्पष्ट केले. तसेच गेल्या तीन महिन्यात दोन्ही गटाच्यावतीने झालेल्या युक्तिवादाची माहितीही नार्वेकर यांनी दिली. शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला.
आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतर कसे करावे, अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवलं. त्यांनी स्वत तीन चार वेळा पक्षांतर केलंय. भविष्यातील मार्ग त्यांनी मोकळा केला. सगळे नियम धाब्यावर बसून नार्वेकरांनी निर्णय दिला. आमच्यामागे महाशक्ती आहे, सुप्रीम कोर्टालाही आम्ही जुमाणनार नाही, असंच त्यांनी दाखवून दिलं. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. नार्वेकर यांनी आपल्या पदाचा, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला. सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. त्याचवेळी आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे? त्यांना अपात्र का केलं नाही? असा सवाल ठाकरेंनी विचारला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असंही ठाकरेंनी सांगितलं.
नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला – संजय राऊत
विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे ते म्हणाले. हा निर्णय नसून हे एक षडयंत्र आहे. ही मॅच फिक्सिंग असल्याचे मी सकाळपासून बोलत होतो. राम वडिलांच्या वचनासाठी वनवासात गेले. ते सत्यवचनी होते. रामाचे नाव घेण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार नाही. इथे ज्या मायबाप शिवसेनेने त्यांना सर्वकाही दिले, तिलाच वनवासात पाठवण्याचे काम केले आहे. इलेक्शन कमिशन हे चोरांचे सरदार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे- भरत गोगावले हे व्हीप नाहीत. भाजपवाले आता शिवसेनेचे भविष्य ठरवणार का? गुजरात लॉबीचे बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचे हे षडयंत्र आहे. हे आम्ही होऊ देणार नाही, त्यांना मुंबईवर कब्जा करू देणार नाही. १०६ जणांनी मुंबईसह महाराष्ट्रासाठी जीव दिला आणि आम्ही आणखीही जीव देऊ, असेही राऊत म्हणाले. विधानसभा अध्यक्ष फक्त एवढंच ठरवू शकतात की, विधिमंडळ पक्ष कोणाचा आहे, पण अख्खा पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. बेकायदेशीर अध्यक्षांनी दिलेला हा बेकायदेशीर निकाल आहे, असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांचा निकाल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनुकूल लागेल असं दिसत नव्हतं. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निकाल काय लागणार यासंबंधी भाष्य केलं होतं, असं शरद पवार म्हणाले. निकालाबाबत जी खात्री होती ती यात दिसेल असं ध्वनीत केलं जात होतं तसाच निकाल दिला गेला. या निकालाबाबत वकिलांशी चर्चा केल्यावर अधिक स्पष्टता येईल. हा निकाल वाचल्यानंतर उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागेल. या निकालाच्या भाष्यावरुन उद्धव ठाकरेंसाठी सुप्रीम कोर्टात सोयीचं होईल, असं दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले.
—
Justice Done..
After the ECI, MH speaker declares, #EknathShinde led faction is the real Shiv Sena. There's no ambiguity "Bow and Arrow" rightly belong to Shinde. Shinde is the true heir of Bala Saheb Thackeray's legacy. #MaharashtraPoliticspic.twitter.com/18lWlayOJU— Ganesh (@me_ganesh14) January 10, 2024