BULDHANACinemaHead linesVidharbhaWomen's World

‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त; १२ जानेवारीला चित्रपटाच्या टीमचा सिंदखेडराजात नागरी सत्कार!

– राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय, मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश

बुलढाणा/सिंदखेडराजा (बाळू वानखेडे/अनिल दराडे) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश मिळाले आहे. देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. आज राज्यमंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, या सत्यशोधक चित्रपटाची टीम १२ जानेवारीरोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या दर्शनाला येणार आहे. यावेळी शहरवासीयांच्यावतीने या टीमचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाला करसवलत देण्यात यावी, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार आज मंत्रालयात झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होऊन सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपटांवर आकारण्यात येणार्‍या १८ टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी ९ टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणार्‍या रकमेची करसवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
दरम्यान, समता फिल्म आणि अभिता फिल्म यांच्यावतीने दिनांक ५ जानेवारी रोजी सत्यशोधक चित्रपट संबंध महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य आणि आनंदमय सहजीवन पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आले आहे. राज्यभर सत्यशोधक सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हा चित्रपट बघितला आहे. इतरांनीसुद्धा हा चित्रपट बघावा याकरिता आवाहन केले आहे. १२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधकची टीम ज्यामध्ये चित्रपटाचे संकल्पक राहुल तायडे, दिग्दर्शक नीलेश जळमकर, निर्माते सुनिल शेळके, ज्योतिबांच्या बालपणीच्या भूमिकेतील प्रथमेश पांडे, सावित्रीबाईंच्या बालपणीच्या भूमिकेतील समृद्धी सरवार यांच्यासह उस्मान शेख, फातिमा शेख, यांच्या भूमिकेतील मोनिका तायडे कलाकारांसह तुकाराम बिडकर, नीता खडसे, कांचन वानखेडे, किरणताई डोंगरे, सीमा जाधव, सह निर्माता राहुल वानखेडे, सहनिर्माता हर्षा तायडे व इतर सर्व कलाकारसकाळी ११:३० वाजता राजवाड्यावर जिजाऊंचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी १२ वाजता अभिता अ‍ॅग्रो एक्स्पोच्या विचारमंचावर संपूर्ण सत्यशोधक टीमचा सिंदखेडराजा शहराच्यावतीने सामूहिक नागरी सत्कार केला जाणार आहे. तरी या सत्कार समारंभास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!