बुलढाणा (संजय निकाळजे) – गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेले सहशिक्षिका कावेरी वाकोडे मॅडम यांच्या बदली प्रकरण व पालकांनी पुन्हा त्यांची याच शाळेवर नियुक्ती करावी, ह्या मागणी प्रकरणाला आज पूर्णविराम मिळाला. गटशिक्षणाधिकारी यांनी मंगळवार, ९ जानेवारी रोजी कोलारा शाळा गाठून या ठिकाणी पालक आणि शिक्षकांची सामूहिक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे आदेश दिले.
चिखली पंचायत समिती मधील कोलारा येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेवर सहशिक्षिका म्हणून कावेरी वाकोडे मॅडम ह्या कार्यरत होत्या. मागील महिन्यामध्ये त्यांची भोकर येथे पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे पालकांनी पुन्हा त्यांची कोलारा शाळेवर नियुक्ती करावी, अशी मागणी प्रशासनाकडे व संबंधित शिक्षण विभागाकडे केली होती. या संदर्भात कोलारा शाळेवरील मुख्याध्यापक बळीसर यांनाही हा प्रकार सांगितल्यानंतर ते देखील मी या ठिकाणावरून जाण्यासाठी तयार असल्याचे पालकांना सांगितले. त्यामुळे पालकांनी आणखीनच ही मागणी संबंधित विभागाकडे रेटून धरली. आणि जोपर्यंत वाकोडे मॅडम यांना कोलारा येथील शाळेवर नियुक्ती देत नाही, तोपर्यंत मुले देखील शाळेत पाठविणार नाही. असा पवित्रा पालकांनी घेतला. आणि गेल्या चार दिवसापासून मुले सुद्धा शाळेत जाऊ दिले नाही. मात्र आज मंगळवार रोजी गटशिक्षणाधिकारी मोरे हे कोलारा शाळेवर दाखल झाले. आणि त्यांनी पालक व शिक्षकांची संयुक्तरीत्या बैठक घेतली. या बैठकीमध्ये पालकांनी शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्तेबाबत चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे गट शिक्षणाधिकारी मोरे यांनी एका वर्गाचीच नव्हे तर सर्वच वर्गाची गुणवत्ता वाढली पाहिजेत, असे आदेश दिले. तसेच वाकोडे मॅडम यांच्याकडे जो दुसरा वर्ग होता तो बंगाळे मॅडम यांच्याकडे देण्यात आला. बंगाळे मॅडम यांनी सुद्धा पंधरा दिवस ते एका महिन्याचा वेळ मागून गुणवत्ता वाढीची हमी उपस्थितांना दिली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली. एकंदरीत या प्रकरणांमध्ये कुणाचा ‘विजय’ झाला असता हे जरी गुलबत्यात असले तरी त्यात विद्यार्थीच ‘बळी’ ठरले असते व त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले असते.
उत्कृष्ट कर्मचाऱ्यासाठीच असं घडतं !
एखादा शिक्षक, शिक्षिका किंवा कर्मचारी यांचे बदली संदर्भात जेव्हा एखाद्या ठिकाणी असे प्रकार घडतात. त्याला त्या शिक्षकाची चांगली शैक्षणिक गुणवत्ता कारणीभूत असते. जो कोणी चांगला शिक्षक कर्मचारी दुसरीकडे बदली झाल्यास ते गाव सोडून जातो. तेव्हा ते पालक तोच शिक्षक आपल्या शाळेवर असावा, असा आग्रह धरतात. मग त्या ठिकाणी त्याची जात, धर्म, पंथ पाहिल्या जात नाही तर त्याची बुद्धिमत्ता सर्व घटकातील पालक वर्ग बघत असतात. कारण त्या शिक्षकाची शैक्षणिक गुणवत्ता, त्याच्या शिकवण्याची पद्धत, त्याच्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी, त्याच्यावरून निश्चितच होत असते. आणि म्हणून अशा शिक्षक किंवा शिक्षिकेची जेव्हा बदली होते. तेव्हा त्या ठिकाणचे पालक त्याला याच ठिकाणी ठेवा. हा आग्रह संबंधित विभाग, प्रशासनाकडे करत असतात. वेळ पडल्यास उपोषण, आंदोलन, एवढेच नाही तर शाळेला कुलूप लावण्यापर्यंत देखील पालक मागे -पुढे पाहत नाहीत. याला केवळ त्या शिक्षकाची चांगली शैक्षणिक गुणवत्ता कारणीभूत असते. आणि हाच विचार जर प्रत्येक शिक्षक बंधू -भगिनींनी केला आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष दिले तर तुमची देखील बदली झाल्यास तुमच्या बाबतीतही पालक वर्ग हाच मार्ग पत्करल्याशिवाय राहणार नाहीत एवढे मात्र निश्चित..!