बिबी (ऋषी दंदाले) – परकीयांच्या गुलामगिरीत असणार्या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करून मनामनात स्वाभिमानाची मशाल पेटविणार्या छत्रपती शिवरायांना जन्म देणार्या जिजाऊं मॉसाहेबांचे कार्य अतुलनीय असून, त्यांचा इतिहास जनसामान्यांच्या कायम ह्रदयात रहावा, याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असणार्या जिल्हा ग्रंथालयास जिजाऊ माँसाहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोकमोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी केली. सिंदखेडराजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी डोंगरे यांनी सिंदखेडराजा येथील समृद्धी बायपासवर छत्रपती शिवबांसह जिजाऊं मॉसाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी शासनस्तरावर बैठक आयोजित करून येत्या २०२५ पर्यंत पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचीदेखील माहिती दिली.
राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील लखुजीराजे जाधव हे ज्या ठिकाणी बसून प्रजेचा न्यायनिवाडा करीत असे, त्या ठिकाणी लखुजीराजेंचा सिंहासनावर आसनस्थ असा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रयत्न करणार असून, सर्वसामान्य जनतेच्या विकासात भर पाडणारी औद्योगिक वसाहत (एम.आय.डी.सी.) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून पुढाकार घेणार आहे, अशी माहितीही डोंगरे यांनी यावेळी दिली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाने जिजाऊ जयंतीच्या दिवशी १२ जानेवारी रोजी सर्व जिजाऊ भक्तासाठी सकाळी ८ ते रात्री उशिरापर्यंत मोफत चहा, पाणी व १०० क्विंटल पोह्यांचे वितरण करणार असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव पाटील, कृष्णा कोल्हे , छावा कार्यध्यक्ष, नारायण मस्के, शेळके पाटील, मनसेचे आशीष राजेजाधव, शिवा पुरंदरे, चंद्रकांत साबळे, रामेश्वर काकडे, देठे महाराज, वाल्मिकी देव्हडे, गोपाल टेके आदींची उपस्थिती होती.
गतवर्षी १२ जानेवारी २०२३ रोजी महेश डोंगरे पाटील यांनी सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता देण्यासाठी रुग्णालयाची मर्यादा ३० खाटाहून १०० खाटांवर आणण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार येत्या दोनच दिवसात शासन आदेश निघणार असून, आपल्या केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असेही डोंगरे पाटील यांनी सांगितले. सिंदखेडराजा परिसरामध्ये बिबी येथे श्री गजानन महाराज संस्थानला भेट दिली व बिबी ग्रामस्थांसह संस्थानच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, पत्रकार बांधवांच्यावतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थांना अध्यक्ष सारंगधर महाराज टेके व कैलास मोरे, संदीप बनकर, शिवाजी काळे, जानकीराम आटोळे, पत्रकार देवानंद सानप, राम जाधव, भागवत आटोळे, दीपक गुलमोहर, गोविंद टेके यांच्याहस्ते डोंगरे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.