पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाही जीवंत आहे, की मेली? उद्या दिसणार!
UPDATE
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील या बैठकीत उपस्थित होत्या.
– राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, की वाचणार?
– शिंदे गट अपात्र ठरला तर निवडणुकीत फटका; ठाकरे गटाविरोधात निकाल गेला तर ठाकरेंना महाराष्ट्राची सहानुभूती!
मुंबई (खास प्रतिनिधी) – महाराष्ट्रात लोकशाही जीवंत आहे, की मेली, हे दर्शविणारा महत्वपूर्ण निकाल उद्या (दि.१०) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अध्यक्षांना या प्रकरणाचा निर्णय १० जानेवारीपर्यंत घ्यायचा होता. यामुळे पुढील ४८ तासांच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असून, त्याचा भाजप व शिंदे गटाला आगामी निवडणुकीत फटका बसणार आहे. तर निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर आधीच महाराष्ट्रात असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहानुभूतीत मोठी वाढ होणार असून, त्याचा ठाकरेंना आगामी निवडणुकांत फायदा होणार आहे. एकूणच निकाल काहीही लागला तरी, त्याचा ठाकरेंना निश्चित राजकीय फायदा होणार असल्याने, शिंदे गटासह भाजपचे टेन्शन चांगलेच वाढलेले आहे. तर, प्रसिद्ध विधीज्ज्ञ तथा ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, विधानसभा अध्यक्ष काहीही निकाल न देता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे ढकलू शकते, असे राजकीय सूत्रांचे मत आहे.
आमदार अपात्रता प्रकरणी निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागणार की शिंदे गटाच्या, याची उत्सुकता राज्यात शिगेला पोहोचली असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बुधवारी म्हणजे १० जानेवारीला दुपारी चार वाजेपर्यंत हा निकाल लागणार आहे, तशी माहिती स्वतः विधानसभा अध्यक्षांनी दिलेली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकालही ३० जानेवारीपर्यंत देण्याचा प्रयत्न आहे, असेही नार्वेकरांनी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, उद्याच्या निकालासंदर्भात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले. ते म्हणाले, की आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातल्या लोकशाहीची खरी कसोटी आहे. ही लढाई ही जनतेच्या भवितव्याची लढाई आहे, असे ते म्हणाले. शिवसेना आमदार अपात्रता निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीला आक्षेप घेत, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याच्या तीन दिवसआधी अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणे अत्यंत अयोग्य आहे, असे ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
उद्याच्या निकालात जर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार अपात्रच ठरले नाहीत तर शिवसेनेच्या दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात आपणच खरी शिवसेना आहोत, हे सिद्ध करावे लागेल. शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी एकूण ३४ याचिकांचा सहा गटांत समावेश करुन सुनावणी पार पडलेली आहे. त्यामुळे निकालाचा केवळ सारांश वाचला जाईल. कोणत्याच गटाचा आमदार अपात्र ठरणार नाही, असाच निकाल येण्याची शक्यता सर्वाधिक मानली जात आहे. कारण शिंदे गटात मुख्यमंत्री शिंदेंसह तीन मंत्री आहेत. शिंदे गट अपात्र ठरला तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. तर ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंना आधीच राज्यात असलेल्या सहानुभूतीत प्रचंड वाढ होईल. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतील, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर जाऊन घेतलेल्या भेटीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जोरदार टीका केलेली आहे. या भेटीमुळे शंकेला वाव आहे, असा आरोप पवारांनी केला होता. तर न्यायाधीशच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. २० डिसेंबर २०२३ रोजी ही सुनावणी संपली. या प्रकरणात आतापर्यंत २ लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली आहेत. तसेच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झालेली आहे.
————–