Breaking newsBuldanaHead linesMaharashtraMetro CityMumbaiVidharbha

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा दणका, शेतकर्‍यांना कोट्यवधींचा चुना लावणार्‍या संतोष रानमोडेच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या!

– तब्बल तीन कोटी ४१ लाख ४२ हजारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
– आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय अशोक जायभाये यांची धडाकेबाज कामगिरी; चतुराईने लपण्याची ठिकाणे बदलणार्‍या रनमोडेला उस्मानाबादेतून उचलले

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) – दोनशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून पळून गेलेल्या व हुशारीने आपली लपण्याची ठिकाणे बदलणार्‍या संतोष बाबुराव रानमोडेच्या अखेर बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज पोलिस अधिकारी एपीआय अशोक जायभाये व त्यांच्या टीमने अत्यंत चपळाईने उस्मानाबादेत जाऊन काल मुसक्या आवळल्या आहेत. एपीआय अशोक जायभाये व त्यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन व बीड, नगर, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांत फिरून ही मोहिम फत्ते केली. रनमोडे याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिसांनी त्याच्याकडून रोख ४२ लाख ११ हजार रुपये, त्याची किया कंपनीची सेल्टॉस ही गाडी किंमत १५ लाख रुपये जप्त केली आहे. पोलिस या रनमोडेची कसून चौकशी करत आहेत. शेतमाल खरेदी फसवणूक प्रकरणाचा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ व ‘साधना न्यूज टीव्ही’, मुंबईच्या टीमने संपादक पुरुषोत्तम सांगळे यांच्या नेतृत्वात पर्दाफास करत राज्यस्तरावर हे प्रकरण उचलून धरले होते, हे विशेष.
आरोपी संतोष बाबूराव रनमोडे (वय ४५) याने चिखली येथे पवित्रा ट्रेडिंग कंपनी या नावाने शेतमाल खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने गांगलगाव (ता.चिखली) येथील अन्य आरोपी साथीदार अशोक समाधान म्हस्के व नीलेश आत्माराम सावळे या दोघांना हाताशी धरले होते. तूर, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या शेतमालाची बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी करून पैसे आरटीजीएस िंकवा चेकने देण्याचे आश्वासन देऊन त्याने तब्बल दोनशेपेक्षा जास्त शेतकर्‍यांकडून शेतमाल खरेदी केली होता. रनमोडे याने दिलेले चेक बाऊन्स झाले तर ज्या शेतकर्‍यांना आरटीजीएसने पैसे देतो म्हणून सांगितले त्यांना आरटीजीएसने पैसे दिले नाहीत. तसेच, आपला फोन स्वीचऑफ करून चिखलीतून पळून गेला होता. त्यामुळे हादरलेल्या शेतकर्‍यांनी चिखली व अंढेरा पोलिस ठाण्यांत धाव घेतली. चिखली पोलिस ठाण्यात सुनील लक्ष्मण मोडेकर (वय ५०) रा. सरस्वती नगर, चिखली यांनी १८ जून २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पवित्रा ट्रेडिंग कंपनीचा मालक संतोष रानमोडे, त्याचा साथीदार अशोक म्हस्के, नीलेश सावळे यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या ४०६, ४०९, ४२०, १२० (ब), ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
चिखली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, रनमोडे व त्याच्या साथीदारांनी शेतकर्‍यांची शेतमाल खरेदीपोटी तब्बल तीन कोटी ४१ लाख ४२ हजार ५०४ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चवरिया यांनी अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात हे प्रकरण बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवले होते. तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी धडाकेबाज पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जायभाये यांच्याकडे सोपवली होती. आरोपी रानमोडे हे फरार झाला होता व सातत्याने आपली लपण्याची ठिकाणे बदलत होता. तसेच, बनावट क्रमांकावरून फोन करून त्याच्या गांगलगाव येथील साथीदारांच्या संपर्कात होता. त्यामुळे रानमोडेच्या मुसक्या आवळणे कठीण काम होते. तरीही एपीआय अशोक जायभाये व त्यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन नगर, पुणे, औरंगाबाद, बीड जिल्ह्यात रानमोडेचा शोध घेतला. एका खबर्‍यामार्फत व टेव्नâीकल रिपोर्टनुसार रानमोडे हा उस्मानाबादेत असल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर जायभाये व त्यांच्या टीमने रात्रीच रानमोडे याच्यावर झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या, व त्याला बुलडाणा येथे घेऊन आले. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने रानमोडे याच्याकडून रोख ४२ लाख ११ हजार ९२० रुपये, त्याची किया कंपनीची सेल्टॉस ही गाडी अंदाजे किंमत १५ लाख रुपये जप्त केले आहेत. गांगलगावचे त्याचे साथीदार अशोक म्हस्के व नीलेश सावळे यांना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे शेतमाल खरेदी प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बुलडाणा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे.

फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी संपर्क साधावा – एपीआय जायभाये
बुलडाणा जिल्ह्यातील व चिखली तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांची पवित्रा ट्रेडिंग कंपनी, एमआयडीसी, चिखली व संतोष रानमोडे यांनी आर्थिक फसवणूक केली असेल, त्यांनी बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेशी आपल्याकडील कागदपत्रांसह संपर्क साधावा व तक्रार दाखल करावी, असे आवाहन या प्रकरणाचे तपास अधिकारी एपीआय अशोक जायभाये यांनी केले आहे. आरोपीची कसून चौकशी केली जात असून, मुद्देमाल हस्तगत करणे, फसवणुकीतील रवäकम वसूल करणे, आदी अनुषंगाने तपास सुरु आहे.

या शेतमाल खरेदी प्रकरणात फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांच्याकडे धाव घेत, आपली व्यथा मांडली होती. त्यांनी तातडीने ही बाब तत्कालिन पालकमंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्यासह साधना टीव्ही मुंबई, व ब्रेकिंग महाराष्ट्र, मुंबईचे संपादक पुरुषोत्तम सांगळे यांच्या कानावर टाकली होती. त्यामुळे या मीडिया हाऊसेसने तातडीने शेतमाल खरेदी फसवणूक प्रकरणात पर्दाफास करणारे वृत्त प्रसारित करून तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे या घटनेकडे लक्ष वेधले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनीही जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करून, आरोपीला अटक करणे, व त्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती. दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक व शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी तर थेट गृहमंत्र्यांना फोन लावून, शेतकर्‍यांचे पैसे परत मिळाले नाही तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा दिला होता.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!