BULDHANAHead linesKhamgaonMaharashtraVidharbha

सोयाबीनला कवडीमोल भाव; संतप्त शेतकर्‍याने कंबरेला एअरगन खोचत, व्यवस्थेवर कोयता उगारला!

– पोलिसांनी ताब्यात घेतलेला शेतकरी सोडा; अन्यथा ताकद दाखवू, रविकांत तुपकरांनी ठणकावले!

खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – मोठ्या कष्टाने पिकवलेल्या सोयाबीन पिकाला जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणार्‍या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कवडीमोल बाजारभाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍याने आणलेली सोयाबीन रस्त्यावर फेकून एकच संताप व्यक्त केला. कमरेला एअर गन खोचून त्याने व्यवस्थेविरोधात कोयता उगारला. सोयाबीनला किमान सहा हजाराचा तरी भाव द्या, म्हणत त्याने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रवी महानकार असे या शेतकर्‍याचे नाव असून, तो नजीकच्या पिंपळखुटा (ता.अकोला) येथील रहिवासी आहे. यावेळी संतप्त शेतकरीही त्याच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खामगाव पोलिसांनी या शेतकर्‍याला ताब्यात घेतले असून, या शेतकर्‍याला सोडा, अन्यथा शेतकर्‍यांची ताकद दाखवून देऊ, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार जाताच, या शेतकर्‍याला चौकशीअंती सोडून देण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले असल्याचे कळते आहे.

सोयाबीनला प्रती क्विंटल ६ हजार रुपये दर मिळावे, अशी या शेतकर्‍याची मागणी होती. मात्र योग्य बाजारभाव मिळत नसल्याच्या रागातून त्याने रस्त्यावर सोयाबीन फेकून देत निदर्शने केली. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून एक खळबळजनक घटना घडली. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला कमी भाव मिळाला म्हणून शेतकर्‍यांने रुद्रावतार धारण केला. हातात कोयता आणि पिस्टल घेत त्याने शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने बुलडाण्यात शेतकर्‍याने कोयता दाखवला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला. सरकारने शेतकर्‍याला ताबडतोब सोडवावे. अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
खामगाव कृषी उत्पन्न समितीत सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने या शेतकर्‍याने रुद्रावतार धारण केला. सोयाबीन खाली सांडून देणार्‍या या शेतकर्‍याने अंगावरील शर्ट भिरकावून दिला. या युवा शेतकर्‍याच्या पॅन्टमध्ये एअर गन खोचलेली आहे. ही गन घातक नसते, तसेच तिला बाळगण्यासाठी शस्त्र परवानगीची गरज नसते. हाती धारदार कोयता व नंतर एअर गन घेऊन त्याने शासनाचा निषेध केला. ‘शेतकर्‍याच्या कष्टाच्या मालाला भाव मिळविण्यासाठी आता हत्यारच राहिले आहे’ ,असे जोरजोरात ओरडून त्याने सांगितले. या घटनेची माहिती कळताच खामगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत शेतकर्‍याला ताब्यात घेतले. पोलिसांनी शेतकर्‍याकडील शस्त्रे जप्त केली असून, या शेतकर्‍याच्या हातात दिसत असलेली पिस्टलसदृश वस्तू एअर गन असल्याचे पोलिसांनी सांगितले.


खामगाव बाजार समितीत तरी चांगला भाव मिळेल म्हणून मी सोयाबीन विक्रीसाठी आणले. पण भाव मिळालाच नाही. मी पिंपळखुटा (जिल्हा अकोला) येथील रहिवासी रवी महानकर असून, शंभर क्विंटल सोयाबीन विकली, पण खर्च भरून निघेल इतकाही भाव मिळाला नाही’ असे माध्यमांशी बोलताना त्वेषाने त्याने सांगितले. मला एकरी ३ क्विंटलच सोयाबीन निघाले. सर्वांचीच अशी वाईट अवस्था असल्याचे त्याने सात्विक संतापाने सांगितले. सोयाबीनला किमान ६ हजार प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे, अशी जोरकस मागणी त्याने केली. यावेळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!