उसतोड कामगारांच्या मजुरीत ३४ टक्के, मुकादमांच्या कमिशनमध्ये एक टक्का वाढ
– उसतोड कामगारांच्या संपावर यशस्वी तोडगा; शरद पवार-पंकजा मुंडे यांनी साधला समन्वय
नगर/पुणे (बाळासाहेब खेडकर) – उसतोड कामगारांच्या मूळ भाववाढीच्या प्रश्नासाठी कारखानदार आणि उसतोड कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी पवार-मुंडे लवादाची बैठक काल (दि.४) ज्येष्ठ नेते खा. शरद पवार व उसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील साखर संकुल येथे पार पडली. या बैठकीत, सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन गाळप हंगामाच्या करारावर ३४ टक्के वाढ, तसेच मुकादम कमिशनमध्ये एक टक्का वाढ करून तो २० टक्के करावा, असा तोडगा निघाला आहे. सदर वाढ ही चालू गाळप हंगामापासून कार्यरत होऊन पुढील दोन हंगामाकरिता म्हणजेच एकूण तीन गाळप हंगामासाठी लागू राहणार आहे. दरम्यान, या बैठकीत शरद पवार व पंकजा मुंडे-पालवे यांच्यात संवाद घडून आला असून, राजकीय जवळीक दिसून आली आहे. हा संवाद घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी मध्यस्थी केली असल्याची माहिती हाती आली आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने व मंत्री धनंजय मुंडे यांना राजकीय शह देण्यासाठी पवार-मुंडे यांच्यात राजकीय जवळीक वाढली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
ऊस तोडणी व वाहतूक मजुरांच्या दरवाढीच्या प्रश्नाबाबत काल पुण्यातील साखर संकुल येथील साखर संघाच्या कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वांच्या मान्यतेने सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन गाळप हंगामाच्या करारावर ३४ टक्के वाढ, तसेच मुकादम कमिशनमध्ये एक टक्का वाढ करून तो २० टक्के करावा, असा तोडगा निघाला. सदर वाढ ही चालू गाळप हंगामापासून कार्यरत होऊन पुढील दोन हंगामाकरिता म्हणजेच एकूण तीन गाळप हंगामासाठी लागू राहील. यावेळी सर्व संघटनांनी तसेच साखर उद्योगाचे प्रतिनिधी व साखर संघ यांनी हा तोडगा मान्य केला. यावेळी, आमदार जयंतराव पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, साखर संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव ओहोळ तसेच साखर संघाचे संचालक हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आणि कल्याणराव काळे, उसतोड कामगारांचे नेते प्रतापकाका ढाकणे यांच्यासमवेत ८ संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे-पालवे या भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या जोरदारपणे चर्चा आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये आली होती. त्यानंतर मुंडे-पवार संवाद अशी घटना काल पुण्यामध्ये घडलेली पाहायला मिळाली. कालच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना आवर्जून एक मिनिट बाजूला घेऊन हितगुज साधली. याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट बरेच काही सांगून जाते. बैठक झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रतापराव ढाकणे यांच्यामध्ये झालेली चर्चा ही शरद पवार यांचा निरोप होता का? अशी चर्चा या निमित्ताने आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंडे-ढाकणे यांची जवळीक नव्या राजकारणाची नांदी?
एकीकडे पंकजा मुंडे पाथर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या चर्चा झडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतापराव ढाकणे हे पाथर्डी-शेवगावचे राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे मुंडे-ढाकणे यांची जवळीक ही भविष्यात राज्यातील एक नव्या राजकारणाची नांदी ठरू शकते. पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी आपण भाजपवर नाराज नसल्याचे बोलून दाखवलेले आहे. मात्र दुसरीकडे त्यांची गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक ही काही लपून राहिलेली नाही. अशातच मुंडे-पवार यांच्या संवादाचा दुवा आता प्रतापराव ढाकणे ठरत आहेत. तर पाथर्डीच्या भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता, प्रतापराव ढाकणे आणि पंकजा मुंडे यांच्यातील चर्चा ही ढाकणे यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता दिसत आहे. तर पंकजा मुंडे यांची राष्ट्रवादीची जवळीकदेखील या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.
पवार- मुंडे मध्यस्थीसाठी ढाकणे यांचा दुसर्या पिढीत प्रयत्न सुरू?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व भाजपचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा टोकाचा राजकीय विरोध हा सर्वश्रुत होता. पण ऊस तोडणी कामगारांच्या विविध प्रश्नासाठी पवार-मुंडे यांच्या मध्स्थीशिवाय निर्णय लागत नव्हता. दर तीन वर्ष कामगारांना दरवाढीसाठी या दोघांच्या लवादाचा निर्णय महत्वाचा घेतला जात होता. गेल्या काही वर्षांपूर्वी असंख्य ऊस तोडणी कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले होते. सुमारे तीन ते चार आठवडे हा संप पुकारला होता. साखर कारखान्याचे गाळप सुरू होऊनही कामगार दरवाढीसाठी कामावर आला नाही. साखर कारखाने अडचणीत सापडले होते. कामगार संघटनांना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पाठबळ दिले होते. कारखानदार व कामगार संघटना यांच्यात तीव्र संघर्ष पेटला होता कामगारांचा हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लागण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांनी मधस्ती करुन शरद पवार व गोपीनाथ मुंडे यांच्यात समेट घडून कामगारांचा हा प्रश्न मार्गी लावण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तीच भूमिका दुसर्या पिढीत बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव प्रतापराव ढाकणे यांनी सुरू ठेवली आहे.
उसतोडणी कामगारांना नवीन दरवाढ!
उसतोडणी मूळ मजुरीदरात ३४ टक्के वाढ व मुकादम यांच्यासाठी एक टक्का कमिशन वाढ ही साखर संघाचे प्रतिनिधी, विविध उसतोड कामगार संघटना, प्रतिनिधी यांच्या बैठकीमध्ये गुरवारी झालेल्या बैठकीत निर्णय झाला.