कोथरुडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’, कुख्यात गुंड शरद मोहोळचा खात्मा
– लग्नाच्या ‘बर्थडे’लाचा भाजप नेत्या स्वाती मोहोळ यांना ‘आक्रोश’ करण्याची वेळ!
पुणे (निमिष जोशी/अमित शिंदे) – पुण्यातील कोथरूडसारख्या उच्चभ्रू परिसरात गुंडगिरीच्या जोरावर दहशत माजविणार्या कुख्यात गुंड तथा भाजपच्या नेत्या स्वाती मोहोळ यांचा पती शरद मोहोळची आज (दि.०५) त्याच्या लग्नाच्या वाढदिवसीच कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भरदुपारी दीड वाजेच्या सुमारास अगदी जवळून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याचाच सहकारी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व इतर तिघांनी अगदी नियोजनपूर्वक हे हत्याकांड घडविले. गुंड मोहोळ हा दुचाकीवरून जात असताना भरवस्तीत त्याला अडवून गोळ्या घालण्यात आल्या. चार गोळ्या लागल्याने त्याला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहोळ याच्या हत्याकांडानंतर कोथरूड परिसरात गँगवार पेटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, मोहोळ याला ससूनमध्ये हलविण्यात आले असता, बाहेर तब्बल पाचशे ते सहाशे तरूणांना जमाव जमला होता. कोथरूड परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हत्याकांडानंतर पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नी स्वातीने भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केलेला आहे. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे जोडपे दिसले होते. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणार्या तीन आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून, साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे या आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर समोरून अगदी जवळून दुपारी १.३० च्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा येथे गोळीबार केला. मोहोळ याला सुरूवातीला सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड व नंतर ससून रुग्णालयात हलवण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी तेथे पाचशे ते सहाशे तरूणांचा जमाव जमला होता. पुण्यातील सुशिक्षित समजल्या जाणार्या कोथरुडमध्ये शरद मोहोळची दहशत आणि गुंडगिरी सुरु होती. योगायोग म्हणजे शरद मोहोळच्या लग्नाचा आज (५ जानेवारी) वाढदिवस आहे. नेमक्या याचदिवशी मोहोळच्या आयुष्याची दोरी कापली गेली आहे.
गोळीबारच्या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा सुतारदर्यात दाखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरून आरोपींची ओळख पटवून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. दरम्यान, मोहोळ याच्या हत्येनंतर पुण्यात गँगवार उफळण्याची शक्यता निर्माण झाली असून, कोथरूडमध्ये तणाव आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरात कोणताही गँगवॉर होणार नाही. कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदाराने केलेली आहे. गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त लावण्याचे काम हे सरकार करते. त्यामुळे गँगवॉर करण्याची हिंमत कोणताच गुंड करणार नाही, असे फडणवीस यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. पुण्यात असलेले मोहोळ आणि गजा मारणे या दोन टोळींमधील वैर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे मारणे टोळीकडून कट रचला गेला तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. या कार्यक्रमाला अनेक गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली होती. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला होता. यात स्वाती मोहोळ यांचादेखील सहभाग होता. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली होती. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. पासेस वगैरे नव्हते, असे म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. शरद मोहोळ विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण परिसरात गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी आहे. कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता. मोहोळच्या दहशतीने कोथरुड हादरत होते. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. तसेच पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. जामिनावर असताना दासवे गावचे सरपंच शंकर धिंडलेंचे त्याने अपहरण केले होते. सरपंचांच्या अपहरणप्रकरणी शरद मोहोळला पुन्हा अटक करण्यात आली. यानंतर खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन केल्यानेसुद्धा अटक करण्यात आली होती. इतकेच नाही, तर जुलै २०२२ मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते. मोहोळ हा सुमारे १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो.
शरद मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव याच्यावर जून २०१२ मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून २०१९ मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी २०१० मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. तेव्हापासून तो जामिनावर बाहेर होता. पुण्यातील या दहशतीची अखेर आज समाप्ती झाली आहे.
—————