– सत्तेवर आलो तर ओबीसींची जनगणना करू, राहुल गांधींचे ओबीसी समाजाला आश्वासन
– मोदी पुन्हा सत्तेवर आले तर बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान निकामी करतील – खरगे
नागपूर (दीक्षा गजभिये) – भारतातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांची यादी करा, आणि त्यांच्या मालकांमध्ये ओबीसी, दलित आदिवासी किती आहेत हे दाखवून द्या. या देशात ओबीसी पन्नास, दलित पंधरा आणि आदिवासी बारा टक्के आहेत आणि तुमचे प्रतिनिधित्व कुठेच नाही? सर्वोच्च कंपन्यांमध्ये इतर मागास वर्ग, दलित आणि आदिवासी कुठे काम करतात हे दाखवून द्या, अशा शब्दांत काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला आव्हान दिले. आमचे सरकार आले तर आम्ही जातनिहाय जनगणना करू. मी जे सुरुवातीला म्हणालो की ही विचारसरणीची लढाई आहे. करोडो लोकांना भाजप सरकारने गरिबीत ढकलले आहे, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी याप्रसंगी दिले. काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस नागपुरात उत्साहात पार पडला. याप्रसंगी विराट सभेला मार्गदर्शन करताना राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली.
राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘काही लोक म्हणतात काँग्रेस पक्षाने काय केले? स्वातंत्र्याच्या आधी जर तुम्ही या देशात आले असता, तर तेव्हा इथे ५००-६०० राजे होते, इंग्रज होते. भारतीय जनतेला कुठलाच अधिकार नव्हता. गरीबाची जमीन जर राजाला चांगली वाटली, तर एका सेकंदात तो राजा ती जमीन घेऊ शकत होता. या सगळ्या अधिकारांचे रक्षण राज्यघटना करते. आंबेडकरांनी, गांधीजींनी, नेहरूंनी मेहनतीने ती बनवली. ती काँग्रेस पक्षाने दिली आहे. आरएसएसचे लोक याच्या विरोधात होते. आज राष्ट्रध्वजाच्या समोर उभे राहून हे सलाम ठोकतात. पण कित्येक वर्षं यांनी तिरंग्याला सलाम नव्हता केला, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी या सोहळ्याला हजर राहू शकल्या नाहीत. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपल्या भाषणात म्हणाले, नागपूरमध्ये एका बाजूला दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. तर याच नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मस्थळही आहे. पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत. संघ या देशाचे वाटोळे करू पाहत आहे. संघाचे विचार जपणार्या भाजप सरकारला जर आपण रोखू शकलो नाही तर देशातील लोकशाही उध्वस्त होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान निकामी होईल, असा सूचक इशाराही खरगे यांनी दिला. त्यांनी आपले भाषण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मराठीतून केले. खरगे हे भाषापंडित असून, त्यांना अनेक भाषा अवगत आहेत. त्यांनी मराठीतदेखील अस्लखीत भाषण केले.
https://twitter.com/i/status/1740331685227724870
मराठीत बोलताना खरगे म्हणाले –
‘मी जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारधारेवर चालतो. पंतप्रधान मोदीजी संघाच्या विचारधारेवर चालत असून, ते समानतेच्या विरोधात आहेत. आज ना उद्या ते पुन्हा एकदा दलितांना खाली खेचतील. आज शिष्यवृत्ती बंद आहे, वसतिगृह बंद आहेत. वंचित, उपेक्षित घटकातील मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. शिक्षण महत्त्वाचे आहे, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’, असा मूलमंत्र दिला. डॉ. आंबेडकरांचा हा विचार पुढे घेऊन जाणे, ही आपली जबाबदारी आहे’, असे खरगे यांनी सांगितले.
Congress showing its power right in the heart of RSS headquarters.. 🔥🔥🔥#CongressFoundationDay pic.twitter.com/IvYpExdVVf
— Spirit of Congress✋ (@SpiritOfCongres) December 28, 2023