२० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण!
– अंतरवली सराटी येथून पायी चालत मुंबईला जाणार; तीन कोटी मराठेही येणार!
– जरांगे-पाटील यांनी संयम बाळगावा, त्यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्यमंत्री
बीड (जिल्हा प्रतिनिधी) – ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. बीडमध्ये आज जरांगे पाटील यांनी अनेक सामाजिक राजकीय घटनांचा अभेद्य साक्षीदार असलेल्या मुंबईच्या आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषणाची घोषणा केली. २० जानेवारीपासून त्यांचे उपोषण सुरु होणार आहे. या आमरण उपोषणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून ते पायी चालत मुंबईला पोहोचणार असल्याची घोषणादेखील जरांगे पाटलांनी केली आहे. याआधी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी दुसर्यांदा उपोषण केले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आपण मराठ्यांना आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडले होते. पण अजूनही या मुद्द्यावर तोडगा निघल्याचे दिसत नाही. उपोषणाच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना संयम बाळगावा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांना केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाच्याबाबत मोठी घोषणा केली. २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटण्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत. त्यांना आडवून दाखवा असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या सभेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकार, छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. आता आरक्षणाशिवाय माघार नाही. २० जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले. यांनी यांचेच हॉटेल जाळले अन निष्पाप मराठ्यांना मध्ये टाकले. निष्पाप पोरांना अडकविण्याचे षडयंत्र सरकारने केले. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती, सरकार झोपू नका. मराठ्यांना राज्यात शांतता हवीय, त्यांना हुसकवू नका. ते कधीच जाळपोळ करू शकत नाहीत, असे जरांगे म्हणाले. ते येवल्याचं येडपट, त्याचच सरकार ऐकतय, ते सोबत बाजाराची पिशवी घेऊन हिंडते, त्यात कागद, मग कशाला बोंबलतो रे मग? अशा भाषेत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. तुला म्हटलं होतं नको नादी लागू. मी लई बेकार आहे, आता कसा बारीक आवाज बोलतो. जरांगे साहेब म्हणतो असे जरांगे म्हणाले. मी म्हणलं डंगराला कशाला बोलायचं, पण हे येडपट बोलते, मग आपण सोडत नसतो, जर कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला सुट्टी नाही, असे भाषेत त्यांनी भुजबळांवर टीका केली.
दरम्यान, जरांगे पाटलांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ‘संयम बाळगावा,’ असे आवाहन जरांगे-पाटलांना केले. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्विकारली आहे. याप्रकरणी २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम बाळगावा.