राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगर पंचायतीच्या जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित
बुलडाणा (विनोद भोकरे) :- राज्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतीमध्ये सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै रोजी जाहीर केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणा संदर्भात सुनावणी झाल्याने आज तो जाहीर केलेला कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रने स्थगित केला असून सदर निवडणुकीसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येणार असल्याचे आयोगाने 14 जुलै रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचारसंहिताही आता लागू होणार नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परित्रक काढण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी काही दिवसांपुर्वी राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष कार्यक्रम निवडणूक कार्यक्रम २०२२ जाहीर केला होता. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.१९५६/२०२१ ची सुनावणी १२ जुलै २०२२ रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत (ओबीसी) दिलेले अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणातील पुढील सुनावणी १९ जुलै रोजी ठेवलेली आहे.
सदर पाश्र्वभूमिच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै जाहीर केलेल्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत. सदर निवडणुकांसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल असेही शेवटी निवडणूक आयोगाने आदेश क्र.रानिआ/नप-२०२२/प्र.क्र./ ०५/का-६ मध्ये स्पष्ट केले आहे. या आदेशावर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रचे अव्वर सचिव संजय सावंत यांची स्वाक्षरी आहे.