चिखली/देऊळगावराजा (कैलास आंधळे) – देऊळगावराजा तालुक्यातील पांगरी येथील श्रेणी क्रमांक-२ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालक शेतकरीवर्गाचे अतोनात हाल होत असून, शिकाऊ डॉक्टरांकडून केल्या जाणार्या उपचारांमुळे जनावरांवर भयानक साईडइफेक्ट होत असल्याने शेतकर्यांच्या लाखोंच्या पशुधनाचा जीव धोक्यात आलेला आहे. धक्कादायक बाब अशी, की प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. येथे तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी मिळाले नाही तर देऊळगावराजा येथे उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील पांगरी येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्र.२ असून, या दवाखान्याला पांगरी,डोईफोडे वाडी, किनी, सिनगाव गव्हाण, गारगुंडी, दगडवाडी यासह ८ गावे जोडलेली आहेत. येथे कंत्राटी तत्वावर घेतलेले डॉक्टर यांना कोणताही अनुभव नसून, त्यांना जनावराची काहीही समज नाही. तरीदेखील या डॉक्टरांनी नोकरीसाठी येथील पदभार स्वीकारलेला आहे. पांगरी येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. सदर दवाखान्या अंतर्गत गावातील जनावरांची अनुभवी डॉक्टर नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. दवाखान्यामध्ये शिपाई व शिकावू डॉक्टर सिध्देश्वर परमेश्वर वाघमारे यांचेकडून जनावरांचे जिवाशी खेळल्या जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यांना काहीच उपचार नीट येत नसून त्यांनी आम्हाला स्वतः लेखी दिले आहे की, मला गायी, म्हसी लावतासुध्दा येत नाही, तसेच भरवतासुध्दा येत नाही, तसेच तपासतासुध्दा येत नाही. चुकीचे औषधोपचार देत असल्याने जनावरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जनावरांची बिमारी ठीक होत नाही तसेच जनावरांचे हाल होत आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला पूर्वीचे डॉ.सुरेश बालचंद्र पवार हे देण्यात यावे. १० दिवसाच्या आत मौजे पांगरी येथे पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर सुरेश भालचंद्र पवार यांना रुजू नाही केले तर सर्व गावकरी घेऊन पंचायत समिती देऊळगावराजा येथे आमरण उपोषण करू, असा इशारा श्रीमंत नागरे, दिनकर डोईफोडे, अमोल डोईफोडे, वैभव डोईफोडे, योगेश डोईफोडे, उद्धव डोईफोडे, प्रदीप वाघ, ज्ञानेश्वर वाघ, राहुल वाघ, सोपान वाघ, प्रभाकर डोईफोडे, गणेश डोईफोडे आदी शेतकरीवर्गाने दिला आहे. याबाबत त्यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनदेखील दिलेले आहे.