मिशन 2024: ‘संघर्षाची तयारी ठेवा, पुन्हा एकदा लढायचंय’; माजी आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) : उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक बोलावली होती. मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. माजी आमदार शिंदे गटात जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलावण्यात आलेली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांशी संवाद साधला 2024 निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले आहेत.
या बैठकीला 30 ते 35 माजी आमदार उपस्थित होते. तयारीला लागा, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांना दिले आहेत. संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे. आता आपली वारंवार बैठक होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, असं उद्धव ठाकरे माजी आमदारांना म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीमध्ये NDA च्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहिर केलं आहे. यापूर्वीसुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी UPA च्या उमेदवार असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या गटात कसे येतील यासाठी शिंदे गटाने फिल्डिंग लावली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही बैठकीचा सपाटा सुरू केला आहे.
एकंदरीतच ४० आमदार फुटल्याने हे नुकसान भरून काढण्यासाठी शिवसेनेने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांना विश्वास दिला आणि सांगितलं की आपल्याला पुन्हा शिवसेना उभी करायची आहे. त्यासाठी एकनिष्ठ राहाण्याची गरज आहे. जे सोडून गेले त्यांची पर्वा करायची नाही, जे सोबत आहेत त्यांच्यासाठी काम करायचं आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.