सीबीआय, नाशिक पोलिस असल्याचे सांगून, घरात घुसले, व्यापारी लुटला!
– लुटलेला मालही केला हस्तगत, शिरपूर तालुका पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव
रवींद्र कढरे (खान्देश ब्युरो चीफ)
धुळे – सीबीआयसह नाशिक पोलिस अशल्याचे सांगत, रात्रीच्या सुमारास एक टोळी बियाणे व्यापार्याच्या घरात घुसली व त्याला लुटले. या टोळीचा पर्दाफास करत, तिच्या काही तासांत शिरपूर तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तसेच, व्यापार्याकडून लुटलेला मालही हस्तगत केला आहे. शिरपूर तालुका पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
शिरपूर तालुक्यातील खारेपाडा (उमरदा) येथील दादल्या गुजर्या पावरा हे किराणा दुकानासह बीबियाणे विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवार, दिनांक १२ रोजी रात्रीच्या सुमारास स्कॉर्पिओ या वाहनातून आलेल्या ५ लोकांनी अनधिकृतपणे पावरा यांच्या घरात प्रवेश करत, आम्ही नाशिकचे स्पेशल पोलीस असून तुम्ही बोगस बियाणे विक्री करत असल्याचे सांगत, घरात झाडाझडती करत खंडणी मागितली. यावेळी पावरा यांच्या पत्नीचे दागिने काढून घेत पावरा यांचा अपहरणाचा प्रयत्न केला. उपस्थित ग्रामस्थांनी संबंधितांना विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याने ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधताच, संशयितांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी नाकाबंदी करत पाचही संशयितांना शिताफीने जेरबंद करत, लुटीचा माल हस्तगत केला. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या नेतृत्वात भिकाजी पाटील, जयराज शिंदे, सईद शेख, प्रवीण धनगर, रणजित वळवी, मनोज पाटील, प्रकाश भिल, मनोज नेरकर यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.