संपर्कप्रमुख काठावर; संपर्कातलेही अधांतरीच.. तर शिंदे- फडणवीसांकडून आ.गायकवाड यांना बळ?
बुलडाणा(✍️ राजेंद्र काळे) :- बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख खा.प्रतापराव जाधव यांचा उध्दव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदे गट? याबाबतची भूमिका अजूनही तळ्यात-मळ्यात असल्याने, संपर्कप्रमुखांच्या संपर्क क्षेत्राबाहेरचे सोडाच.. पण संपर्कातले शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक अधांतरीच लटकलेल्या अवस्थेत संभ्रमीत झालेले दिसतात. जर प्रतापरावांची ‘भूमिका’ न घेण्याची ‘भूमिका’च कायम राहीलीतर, बुलडाणा लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे-फडणवीसांकडून ‘भूमिका’ घेण्यात न कचरणारे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना बळ देण्याची ‘भूमिका’ घेण्याचे संकेत सुत्रांकडून मिळत आहे.
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीचा दिवस करुन, महाराष्ट्रात सत्तांतर केले. या सत्तांतरात शिवसेनेचे ४० आमदार उध्दव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंकडे गेले. त्यात बुलडाणा जिल्ह्याचे संजय गायकवाड व संजय रायमुलकर यांची भूमिका महत्वाची होती. वास्तविक हे दोघेही सेना खासदार प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय. त्यामुळे दोघांच्या जाण्यात प्रतापरावांची ‘भूमिका’ महत्वाची असेल, असे वाटत असतांना त्यावेळी मात्र प्रतापरावांनी यात कुठलीही ‘भूमिका’ नसल्याचे स्पष्ट केले होते. आमदारांच्या या फाटाफुटीनंतर जवळपास १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितल्या जात होते. यात वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी थेट भूमिका सुध्दा घेतली होती. परंतु बुलडाण्याचे खासदार मात्र कुठल्याही भूमिकेत दिसत नव्हते. त्यांनी पक्षप्रमुख ठाकरेंनी बोलावलेल्या दोन्ही बैठकींना ‘मातोश्री’वर हजेरी लावली. त्यांचे सुपूत्र तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनीही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बैठकीला हजेरी लावली. द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपदी पदासाठी पाठींबा देण्याची भूमिका जी खासदारांनी घेतली, त्यात प्रतापरावांची काय ‘भूमिका’ होती, हे मात्र कळू शकले नाही. असे असलेतरी उध्दव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे, त्यांनी खासदाराच्या मागणीचा मान राखल्याचे दिसून आले. त्यामुळे तूर्त तरी थेट उध्दव ठाकरेंविरोधात ‘भूमिका’ घेण्याचे डावपेच खासदारांच्या गटातून मागे पडू शकतात.
अशा परिस्थितीत खा.प्रतापराव जाधव यांची भूमिका जर अशीच काठावर राहिलीतर, शिंदे-फडणवीस म्हणण्यापेक्षा भाजपाकडून जी लोकसभेची तयारी सुरु झाली आहे.. त्यात एक जिल्हा नेतृत्व म्हणून आ.संजय गायकवाड यांना मोठे बळ दिल्या जाण्याचे संकेत आहेत. घाटावर नव्हेतर घाटाखाली सुध्दा संजुभाऊ गायकवाड यांना मानणारा वर्ग अगदी छावा संघटनेपासून आहे. बुलडाणा मतदार संघाच्या व्यतिरिक्तही त्यांनी इतर मतदार संघात सुध्दा प्रभुत्व तयार केले आहे. काही महिन्यापुर्वीच खामगाव मतदार संघातील एका घटनेत त्यांनी भेट देवून घाटाखालीही माहौल तयार केला होता. त्यात कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनही त्यांची ओळख असल्याने, शिवसेना आमदारांमध्ये त्यांच्या वक्तव्याला राज्यव्यापी प्रसिध्दी मिळते. शिंदे गटात ज्या काही मोजक्या आमदारांना सध्या पुढे केल्या जात आहे, त्यात संजय गायकवाड हे अग्रक्रमावर आहे. त्यांनी नुकतीच शिवसेना प्रवत्तेâ संजय राऊतांवर केलेली टिका, ही अगदी राष्ट्रीय पातळीवर बातमी बनून चर्चेची ठरली होती. किरीट सोमय्यांनी जेंव्हा उध्दव ठाकरेंवर टिका केली, तेंव्हा शिंदे गटाकडून आ.गायकवाड यांनी पुढे येवून ठाकरेंवर अशी टिका सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.
एकूण, आ.संजय गायकवाड यांची वक्तव्ये अन् त्यांना सध्यातरी म्हणविणाऱ्या शिंदे गटाकडून बोलण्यासाठी मिळणारा वाव बघता.. खा.प्रतापराव जाधव यांची भूमिका जर काठावरच राहिलीतर, भूमिका घेणाऱ्या आ.गायकवाड यांना बुलडाणातून लोकसभेसाठी पुढे केले जाण्याचे संकेत आहेत