राज्यभर पावसाचे धुमशान, ५ जिल्ह्यांत रेड अॅलर्ट, १४ बळी
पुढील चार दिवस जोरदार पाऊस, पंचगंगा, कृष्णा, गोदावरीला महापूर
– नगरला जोडणारे सात पूल पाण्याखाली
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – राज्यात चोहीकडे पावसाचे धुमशान सुरु आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस आणखी जोरदार पावसाचे वर्तवले असून, पाच जिल्ह्यांना रेड अॅलर्ट देण्यात आला असून, तेथील आपत्ती निवारण कक्षांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. प्रचंड पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गावे, वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची संततधार सुरुच आहे. ताज्या रडार आणि सॅटेलाइट ऑब्सनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील २.३ तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊसामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून, अंत्यत धोक्याच्या पातळीवरुन नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात होत असल्यामुळे अहमदनगरला जोडणारे सातपैकी पाच वाहतूक संपर्क पुल पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वाहनधारकासाठी या मार्गावरुन वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील सरला बेटावरील गुरूपौर्णिमा उत्सव स्थगित ठेवण्यात आला असून, आज लाखोंच्या संख्येने भविक वर्ग तेथे उपस्थित राहण्याची शक्यता होती. परंतु, वांजरगाव येथून सराला बेटाला जोडणार्या संपर्क पुलापर्यत पुराचे पाणी येऊन ठेपल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांची भेट घेऊन बेटावरील गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला भाविकांना प्रवेश देऊ नका, अशी विनंती केली होती.रामगिरी महाराजांनी नदी पातळी धोक्याच्या स्थितीतून वाहात असल्यामुळे त्यांनी प्रशासनाने केलेल्या मागणीला प्रतिसाद देऊन सराला बेटावरील कार्यक्रमाला भाविकांनी येवू नये, असे आवाहन त्यांनी केल्यामुळे प्रशासनाने नि:सुटकेचा श्वास घेतला. गोदावरी नदी पात्रात नाशिक जिल्ह्यातील दारणा १४३४२, कडवा – ३५१७, गंगापूर धरण -१००३५ , होळकर पूल, नांदूर मधमेश्वर वळण बंधा-यातून एकूण ७९,८४८ क्युसेक वेगाने जलविसर्ग सोडण्यात आला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
पावसामुळे ११ जणांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात स्कॉर्पिओ गाडी पाणी वाहत असूनही चालकाने पुलावर घातल्याने मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले. तर, नाशिक जिल्ह्यात एका सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच जण तर नंदुरबार जिल्ह्यात दोन महिला वाहून गेल्या. मुंबई उपनगरात दोन तर गडचिरोलीत प्रत्येकी एक बळी गेला आहे.
——————