Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitical NewsPolitics

जरांगे पाटलांची तब्येत खालावली!

– प्रचंड अशक्तपणा, उलट्याही झाल्यात, किडनी व लिव्हरवर सूज

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी प्राणांतिक उपोषणास बसल्यानंतर तब्बल नऊ दिवस अन्न व पाण्याविना राहणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत कमालीची खालावली आहे. त्यांना शहरातील गॅलेक्सी मल्टिसिटी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या किडनी व लिव्हरला सूज आली असल्याचे निदान झाले आहे. धक्कादायक बाब अशी, की त्यांना रूग्णालयात उलट्या होऊन चक्कर आल्याने डॉक्टर सतर्क झाले आहेत. पुढील दोन आठवडे त्यांना रूग्णालयात डॉक्टरांच्या निगरानीखाली वैद्यकीय उपचार दिले जाणार असून, त्यांच्या वैद्यकीय उपचारावर राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी मराठा समाजाच्यावतीने प्रार्थना केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याची बातमी आज सकाळीच समोर आली, आणि राज्यात एकच खळबळ उडाली. गुरूवारी रात्री त्यांना रूग्णालयात आणण्यात आले होते. लगेचच त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्याचे रिपोर्ट डॉक्टरांना प्राप्त झाले आहेत. या रिपोर्ट्समध्ये मनोज जरांगे पाटलांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आल्याची माहिती समोर आली. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात उलट्या झाल्या आहेत. त्यांना प्रचंड चक्कर आले आहेत. तसेत त्यांचा अशक्तपणा वाढला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार युद्धपातळीवर सुरु आहेत. पण त्यांना अचानक उलट्या झाल्यामुळे आणि चक्कर आल्यामुळे चिंता वाढल्याची परिस्थिती आहे.
जरांगे पाटील यांना यावेळी अधिक त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुढचे दोन आठवडे त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत त्यांना यावेळी जास्त अशक्तपणा आहे. तसेच वजनदेखील खूप कमी झाले आहे. लिव्हर आणि किडनीचे पॅरामीटरदेखील डिरेंज झाले आहेत. ब्लडप्रेशरही कमी आहे. लिव्हर व किडनीवर इन्फेक्शन झालेले असून, त्यामुळे सूज आहे. रक्तचाचण्यात अनेक घटक वाढल्याचे दिसून आले असून, बिलीरूबिनाची पातळी वाढली आहे, त्यामुळे पित्ताचे प्रमाण वाढून कावीळदेखील होऊ शकते. त्यादृष्टीने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद तावरे हे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करत असून, त्यांच्याच निगरानीखाली जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली आहे. सद्या जरांगे पाटलांना अशक्तपणा, ताप असल्याने त्यांना आराम करण्यास सांगितले असून, मोजक्याच सहकार्यांशिवाय इतर कुणाला भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!