‘तुपकर चले जाव’च्या घोषणा; सोफ्यावर बसलेल्या तुपकरांना हात धरून उठवले!
– राज्यभरातील बैठका उधळून लावण्याचा इशारा; तुपकरांच्या दौर्याला लागणार ‘ब्रेक’?
– पुढार्यांना बंदी असताना तुम्ही लातुरात आलेच कसे काय?: मराठा तरूणांचा संतप्त सवाल
लातूर (गणेश मुंडे) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी सद्या राज्यव्यापी दौर्यावर आहेत. आज (दि.२८) सकाळी त्यांची लातुरातील शासकीय विश्रामगृहावर बैठक सुरू असताना अचानक मराठा तरूण तेथे धडकले. ‘पुढार्यांना गावबंदी केली असताना तुम्ही आलेच कसे?’, असा संतप्त सवाल या मराठा तरूणांनी तुपकरांना विचारला, त्यांची ही बैठक उधळून लावली. यावेळी रविकांत तुपकर चले जाव अशा घोषणा देण्यात आल्यात. सोफ्यावर बसलेल्या तुपकरांना हात धरून उठवले गेले. त्यामुळे तुपकरांना तातडीने लातूर सोडावे लागले. तुपकरांच्या राज्यव्यापी दौर्याला मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यामुळे ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, सर्व ठिकाणी तुपकरांसह सर्व राजकीय पुढार्यांना विरोध करण्याची भूमिका मराठा तरूण घेणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
सोयाबीन, कापूस उत्पादकांना सरसकट एकरी दहा हजारांची मदत देण्यात यावी, यासह विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सद्या राज्यव्यापी दौर्यावर आहेत. दुसरीकडे, ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे प्राणांतिक उपोषण सुरू असून, मराठा समाजाने सर्व नेते, राजकीय पदाधिकारी व पुढारी यांना गावबंदी केलेली आहे. या मराठा आंदोलनाचा रविकांत तुपकर यांना मराठवाड्यात पहिल्यांदाच फटका बसला आहे. आज (दि.२८) सकाळी लातुरातील औसा रोडवरील शासकीय विश्रामगृहात तुपकरांची बैठक सुरू असताना तेथे मराठा तरूण धडकले. एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राजकीय पुढार्यांना मराठा समाजाने गावबंदी केली असताना, तुम्ही लातुरात आलेच कसे, असा संतप्त सवाल या तरूणांनी तुपकरांना केला. लातुरातच काय पण महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाची सभा, बैठक आम्ही होऊ देणार नाही, तुम्ही तातडीने परत जा, असा इशारा या मराठा तरूणांनी तुपकरांना दिला.
https://breakingmaharashtra.in/ravikant_tupkar_latur/
यावेळी रविकांत तुपकर विश्रामगृहातील एका सोफ्यावर बसले होते. मराठा आंदोलकांनी त्यांना घेरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘रविकांत तुपकर चले जाव’, ‘रविकांत तुपकर परत जा, परत जा’ अशा घोषणा आंदोलक देत होते. रविकांत तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक तुपकर यांच्यासमोर जोरजोरात घोषणा देत राहिले. अखेर रविकांत तुपकर यांनी सोफ्यावरुन उठत बैठक रद्द केली आणि ते माघारी फिरले. मराठा समाजाचा उद्रेक पाहाता, तुपकरांनीदेखील लातूर सोडणे पसंत केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे तुपकरांनी या मराठा तरूणांना सांगून पाहिले, परंतु तरूण काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यामुळे बैठक आणि पत्रकार परिषद सोडून तुपकरांनी लातुरातून काढता पाय घेतला.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून लातूर जिल्हयातील अनेक गावांत पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे तसेच पुढाऱ्यांना अडवून जाब विचारला जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अंबादास दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, रोहित पवार, हसन मुश्रीफ, अजित पवार या नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा फटका बसला होता. त्यानंतर शनिवारी लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
रविकांत तुपकरांनी लातूरमध्ये मराठा आंदोलकांसमोर त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उभारलेल्या प्रत्येक लढ्यात माझा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही नेहमीच आग्रही आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी मी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पाठिंबा दिला होता, तर माझी पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली होती.
मराठा आरक्षणासोबतच शेतमालाला रास्त भाव मिळावा ही मागणीसुद्धा तितकीच महत्वाची आहे. कारण बहुतांश मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे शोषण झाले म्हणूनच मराठा समाजाचा आर्थिक स्तर खाली गेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासोबतच सोयाबीन-कापसाला भाव मिळणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी माझा विदर्भ-मराठवाड्याचा दौरा सुरू आहे. त्या अनुषंगाने आज लातूर जिल्ह्याचा दौरा होता. परंतू काही मराठा आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा भावनांचा आदर करतो. मी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मी पूर्वी पासूनच अग्रभागी आहे. त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही…