– आई-वडिलांच्या संस्काराची परंपरा जोपासत राहू – प्रा. उद्धवराव घुबे
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक संचालिका स्व. कमल (आई) शेणफडराव घुबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिराचा परिसरातील गावांतील शेकडो गरजुंनी लाभ घेतला. नेत्ररोग तपासणी, महिलांचे विविध आजार व इतर रुग्णांची यावेळी मोफत तपासणी करण्यात आली. नेत्रदोष आढळलेल्या ५३ रूग्णांची यावेळी नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. कमलआईंच्या आठवणींना व कार्याला उजाळा दिला.
स्वर्गीय कमल आई शेणफडराव घुबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त देऊळगाव घुबे येथे भारत शिक्षण प्रसारक मंडळ व विठ्ठल पार्वती अर्बन, डीएसके कॉम्प्युटर, विठ्ठल पार्वती प्रâुट प्रोसेसिंग प्लँटच्यावतीने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये नेत्र तपासणीमध्ये नांदुरा येथील श्री तिरुपती बालाजी संस्थानद्वारा संचलित मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी व चिकित्सा करण्यात आली. या नेत्र तपासणी शिबिराला जवळपास ३०४ लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली. यामध्ये लोकांना अतिशय कमी किमतीमध्ये चश्मेवाटप करण्यात आले. त्यासोबतच डोळ्यात टाकणार्या ड्रॉपचेसुद्धा वाटप त्या ठिकाणी करण्यात आले. जवळपास ५३ लोकांची ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली, त्यानंतर भव्य आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार मार्गदर्शन शिबिरामध्ये डॉक्टर गणेश देवकर बुलढाणा यांच्यावतीने संधिवात, सांधेदुखी, गुडघे दुखणे, अर्ध डोकेदुखी, मूळव्याध, अशा सर्व आजारासंबंधी जवळपास १५३ लोकांनी या संधीचा लाभ घेऊन डॉक्टर गणेश देवकर यांचे मार्गदर्शन या सर्व पेशंटला लाभले. त्यानंतर स्त्रीरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबिरामध्ये डॉक्टर योगेश शिंदे, बुलढाणा यांनीसुद्धा या ठिकाणी सेवा देऊन महिलांना येणार्या अडचणी व त्यासंबंधी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेणफडराव घुबे व त्यांच्या परिवाराने दिलेल्या हाकेला परिसरातील तसेच गावातील सर्व लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तळागाळातील गोरगरीब लोकांनी या संधीचा मोठ्या संख्येने फायदा घेऊन आपल्या आरोग्यविषयी सर्व समस्यांचे निराकरण करून घेतले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व डॉक्टरांचे भारत शिक्षण प्रसारण मंडळाच्या व विठ्ठल पार्वती अर्बनच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यासोबतच आत्ताच दोन दिवसांपूर्वी आपल्या कर्तव्यावर असताना भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेले स्वर्गीय अक्षय गवते यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. उद्धव घुबे यांनी स्वर्गीय कमल आई यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त २२ तारखेपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन व येणारे दोन दिवसातले विविध कार्यक्रम कशा पद्धतीने होतील व आईने दिलेल्या संस्काराची आठवण करून दिली. तळागाळातील सर्वसामान्यांच्या समस्याची जाणीव आमच्या परिवाराला नेहमी राहिली आहे. आमचा परिवार प्रत्येकवेळी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये सतत काम करत राहण्याची शिकवण आम्हाला आमच्या आई-वडिलांच्या संस्कारातून मिळाली आहे, व आमच्या आई-वडिलांच्या संस्काराची परंपरा समाजाप्रती अशीच कायम राहील, अशी शाश्वती प्रा. उद्धवराव घुबे यांनी दिली. यावेळी डॉ. मारोती देशमाने यांनी त्यांचीसुद्धा जडणघडण जानकीदेवी विद्यालयातून कशी झाली, विशेष करून आंबसकर सर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन कसे लाभले, ते सांगितले. डॉ.गणेश देवकर यांनीसुद्धा आपल्या मनोगतामध्ये अशा आरोग्य शिबिराची समालाजला किती गरज आहे ते समजावून सांगितले. या वेळी परिसरातून आलेले सर्व पेशंट उपस्थित होते. गावातील सर्वच सन्माननीय मंडळी, त्यासोबतच भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक विठ्ठल पार्वती अर्बनचे संचालक, डीएसके कॉम्प्युटर, विठ्ठल पार्वती प्लांटचे सर्व सदस्य, गावातील तरुण मंडळी त्यासोबतच जानकीदेवी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. प्राचार्य हरिदास घुबे यांनी कार्यक्रमाचे संचलन करून प्रा. उद्धव घुबे यांनी आभार व्यक्त केले. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेणफडरावजी घुबे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी व नियोजनाविषयी सर्वांचे कौतुक केले व सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार व्यक्त केले.
———