– केळवदनजीक भरधाव कारने दुचाकीला ठोकारले, युवक जागीच ठार, एकजण गंभीर जखमी
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – समृद्धी महामार्गाने नागपूर येथे दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणार्या चिखली येथील अनुयायांच्या वाहनाला अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बोडखानजीक झालेल्या भीषण अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यात काही महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर अमरावती येथे वैद्यकीय उपचार सुरू आहे. तर अन्य एका दुर्घटनेत, चिखली-बुलढाणा राज्यमार्गावरील केळवदनजीक आज (दि.२४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार झाला असून, अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बुलढाणा येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या दोन घटनांनी जिल्हा हादरला होता.
चिखली येथील काही अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जात होते. समृद्धी महामार्गावर निंभोरा बोडखानजीक त्यांच्या पीकअप वाहनाला अपघात झाला. त्यात १४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले होते. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. अनेकांच्या डोक्याला मार लागला असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.
अन्य एका दुर्घटनेत, चिखली तालुक्यातील शिरपूर येथील दोन तरूण दुचाकीने बुलढाण्याकडे जात होते. दरम्यान, केळवदजवळ समोरून भरधाव येणार्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी बाजूला फेकली गेली. तर कारदेखील रस्त्याच्या बाजूला जाऊन कलवंडली. या दुर्देवी अपघातात तेजस वैâलास हिवाळे (वय २०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी सुनील हिवाळे हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या जखमी युवकांना तातडीने मदत करण्यासाठी शाहू परिवाराचे संदीपदादा शेळके यांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच सुनील हिवाळे यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू झाले होते.
———–