– पैसे वाढवून दिल्याशिवाय ऊसतोड नाही; सरकारला ठणकावले! – सावरगाव येथील दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे-पालवेंनी स्पष्ट केली पुढील राजकारणाची दिशा
शेवगाव/सावरगाव, जि. बीड (बाळासाहेब खेडकर) – कोण म्हणते मी या पक्षात चालले, त्या पक्षात चालले. त्रिदेवांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आता आपल्याला त्रास देणार्याचे घर उन्हात बांधू. माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आता संयम नाही मैदानात उतरणार, असे जाहीर करून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे-पालवे यांनी प्रीतमताई घरी बसतील तुम्ही लढा, असे मुळीच चालणार नाही, असा थेट इशाराच भाजपच्या पक्ष नेतृत्वाला देत, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न तुम्हा सगळ्यांसाठी पाहिले आहे त्यासाठी मी आता मैदानात उतरणार. मी पडले ते झाले.. आता पाडणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकाला दिला. इकडची सीट लढा तिकडची सीट लढा, प्रीतमताई घरी बसतील तुम्ही लढा असले काही चालणार नाही. कारण मी कुणाच्या मेहनतीच खाणार नाही. तुम्ही म्हटले तर कापूस वेचायला जाईल, ऊस तोडायला जाईल. पण स्वाभिमान गहान ठेवणार नाही, असेही पंकजांनी स्वपक्षाच्या नेत्यांना या जाहीर मेळाव्यातून ठणकावले.
बीड जिल्ह्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या सावरगाव या संत भगवानबाबांच्या जन्मगावी पंकजा मुंडे-पालवे यांचा दसरा मेळावा याहीवर्षी प्रचंड जल्लोषात व तुडूंब गर्दीच्या साक्षीने पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाची दिशाच स्पष्ट केली. त्या म्हणाल्यात, की तुम्ही उन्हात बसले म्हणून स्टेजवरच्या सर्वांना उन्हात ठेवले आणि मीही उन्हात आहे. एकवेळ मला काही देऊ नका पण माझ्या माणसांना सत्तेपासून आणि हक्कापासून दूर ठेवता येणार नाही. ‘ना जाने कैसे परखता है मुझे मेरा उपरवाला, इम्तेहान भी सख्त लेता है, पर हारने नही देता..’ पराभव म्हणजे खुर्चीतून पडले असेन, पण माझ्या लोकांच्या नजरेतून पडले नाही. देशात सगळं आलबेल असेल तर तुम्ही का आलात. शेतकरी खरंच आनंदात आहेत का? शेतमजुरी करणार्यांना शेतात काम आहे का? त्यांना मजुरी द्यायला शेतकर्यांकडे दाम आहे का? पैसे वाढवून दिल्याशिवाय ऊसतोड मजूर ऊसतोडीला जाणार नाही, असेही पंकजांनी याप्रसंगी सरकारला ठणकावले.
राजकारणात जय-पराजय होतच असतात. मी पडले ते झाले आता पाडणार असे म्हणत पंकजा मुंडे -पालवे यांनी त्यांचा निर्धार बोलून दाखवला. गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न तुम्हा सगळ्यांसाठी पाहिले आहे त्यासाठी मी आता मैदानात उतरणार. मी पडले ते झाले.. आता पाडणार आहे. कुणाला पाडणार? जो चारित्र्यहीन असेल आणि पैशांच्या जोरावर राजकारण करत असेल त्याला पाडणार. जो शेतकर्यांच्या हिताचे राजकारण करत नसेल त्याला पाडणार. जो तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून काढणार नाही त्याला पाडणार. जो या महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यात अडसर असेल त्याला पाडणार आहे. आता फक्त मेरीट राहिल. समाजासाठी सेवा करणारे नेतृत्व, चारित्र्यसंपन्न नेतृत्व घडवण्यासाठी मी रात्रीचा दिवस एक करणार. मला काही मिळो न मिळो पण पुढची पिढी गोड जेवण जेवेल यासाठी मी माझे आयुष्य खर्ची घालणार आहे, असा निर्धारही पंकजांनी याप्रसंगी बोलून दाखवला.
आज महाराष्ट्रात गंभीर प्रश्न मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाबाबत उपस्थित होत असताना या सरकारकडून आणि नेत्यांकडून समाजाची खूप अपेक्षा आहे, या अपेक्षाभंग होणे आता जनतेला सहन होणार नाही. ज्यांना पद, प्रतिष्ठा आणि मान मिळतो त्यांचे भागते. दरवेळी तुम्ही आशा लावता आणि दरवेळी तुमचा अपेक्षाभंग होतो. पद न घेता निष्ठा काय असते, या लोकांना विचारा. जिंकण्यासाठी निष्ठा, नीतीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आपल्याला त्रास देणार्यांचे घर उन्हात बांधू. ज्या ठिकाणी तुमचं भलं त्याचं ठिकाणी पंकजा नतमस्तक होणार, असेही याप्रसंगी पंकजा मुंडे-पालवे यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडेंचे स्मारक बनवू नका!
गोपीनाथ गड तीन महिन्यात मी बनवला पण, आता इतकी वर्षे झाली तरीही सरकारने गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे केलेले नाही. मी सरकारला सांगू इच्छिते की आता ते स्मारक बनवूही नका. आता काही तयार करायच असेल तर शेतकर्याचे कष्ट दूर करणारी जादूची कांडी तयार करा. ऊसतोड कामागारांना न्याय मिळेल असे काहीतरी करा.. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक हे तेच असेल, असेही पंकजांनी आपल्याच सरकारला ठणकावून सांगितले.