ChikhaliHead linesVidharbha

चिखली तहसीलदारांच्या नावे दिघेकर ज्वेलर्सला लाखोंचा गंडा घालण्याचा प्रयत्न फसला!

– म्हणे, तहसीलदारांना सोने घ्यायचे आहे..?

चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या नावाने शहरातील डीपी रोडवरील दिघेकर ज्वेलर्सला गंडा घालत १२ ते १५ ग्रॅमच्या अंगठ्या आणि चेन लंपास करणार्‍या भामट्याच्या मुसक्या आवळ्यात चिखली पोलिसांना अखेर यश आले आहे. तहसीलदार कव्हळे साहेबांना सोने घ्यायचे आहे असे सांगत, या सराफा व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

तहसीलदार सुरेश कव्हळे साहेबांना सोने घ्यायचे आहे, त्यांनी विश्वसनीय तसेच खात्रीचे दुकान म्हणून तुमच्या दुकानात पाठवले आहे, असे या भामट्यांनी चिखलीतील प्रतिष्ठित सराफ व्यापारी दिघेकर ज्वेलर्स यांना सांगितले. त्यानंतर हे सोने घेऊन तो तहसील कार्यालयातही गेला. संबंधित व्यापार्‍याने तहसीलदार कव्हळे यांच्या संपर्क साधल्यानंतर त्यांना सत्य परिस्थिती समजली आणि आपण फसल्याची जाणीव झाली. शहरातील डीपी रोडवरील दिघेकर ज्वेलर्समधील ही घटना असून, दुकानात गर्दी असल्याने दुकानात आलेल्या एका युवकाने सराफा दुकान मालकाला बोलण्यात गुंतवले आणि तहसीलदार साहेबांना सोन्याच्या अंगठ्या आणि चेन खरेदी करायचे आहेत, असे सांगितले. दुकान मालकाने आपला गाडीचालक सोबत दिल्यावर त्यांच्यासोबत अंदाजे वजन १२ ते १५ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या आणि चेन दिल्या.
ड्रायव्हर आणि चोरटा व्यक्ती तहसील कार्यालयात गेले असता, त्यावेळी साहेब तेथे नसल्याने त्या भामट्याने डायव्हरला नायब तहसीलदार यांच्या केबीनमध्ये नेले. तुम्ही इथे थांबा मी ऐवज साहेबांना दाखवतो असे सांगून त्याच्याजवळून अंगठ्या असलेली पिशवी घेतली आणि काही क्षणात परत येऊन साहेबांनी तुम्हाला येथे थांबायला सांगितले आहे, असे सांगून पोबारा केला. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल होताच, मोठ्या शिताफीने पोलिसांनी भामट्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपीला जेरबंद केले.


याबाबत तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी सांगितले, की आपल्या नावाने सराफ व्यापार्‍याची फसवणूक करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात आले आहे. अशा गोष्टी घडत असतील तर लोकांनी सावधान राहिले पाहिजे. सरकारी अधिकार्‍यांच्या नावाने असा काही प्रकार होत असेल तर पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे आणि त्याची खात्री केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!