शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा शाळेवर बहिष्कार!
– श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
– मुख्याध्यापकांच्या बदलीसाठी गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकवर्ग आक्रमक
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, या वादात एस. बी.सोळंकी सरांसारख्या विद्यार्थिप्रिय व प्रामाणिक शिक्षकाची बदली झाल्याने पालकवर्ग व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. वादग्रस्त मुख्याध्यापकांची बदली करा, व सोळंकी सरांची बदली रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेत येणार नाही, अशी भूमिका विद्यार्थी, विद्यार्थिनींनी घेतला आहे. तसेच, मेरा बुद्रूकसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीदेखील या शाळेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे येथे अभूतपूर्व पेच निर्माण झालेला आहे. या प्रश्नात शिवाजी शिक्षण संस्था काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील १३ ते १५ हजार लोकसंख्येचे गाव असलेले मेरा बुद्रूक या गावातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक एस. बी. सोळंकी यांच्या बदलीने गावातील ग्रामस्थ व पालक आज (दि.६) चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारण्यासाठी शाळेत धाव घेतली. परंतु, या भेटीत ग्रामस्थ व पालकांचे समाधान न झाल्याने जोपर्यंत एस. बी. सोळंकी सरांची बदली रद्द करून त्यांना या शाळेवर घेत नाही, तोपर्यंत शाळेतला एकही विद्यार्थी आम्ही पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने अभूतपूर्व पेच निर्माण झालेला आहे. पालकांच्या या भूमिकेनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी लगेच शाळा सोडली. प्राचार्यांची बदली करा, व सोळंकी सरांची बदली रद्द करा, अशी आक्रमक भूमिका पालकवर्ग, ग्रामस्थांसह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने मुलींची प्रतिक्रिया घेतली असता, जोपर्यंत सोळंकी सर शाळेवर पुन्हा रुजू होत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व मुली या शाळेत येणार नाही, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. या प्रश्नावर शिवाजी शिक्षण संस्था काय मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.