Breaking newsBuldanaBULDHANAVidharbha

मर्दडीच्या घाटात एसटी बस दरीत कोसळली; चार प्रवासी गंभीर जखमी

– घाटातील वळणावर बस न वळल्याने सरळ दरीत गेली; प्रत्यक्षदर्शींची माहिती

धाड (प्रतिनिधी) – भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस मर्दडीच्या घाटात दरीत कोसळली. त्यापूर्वी बसने एक-दोन पलट्याही खाल्ल्याचे प्रवाशांनी सांगितले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली. आज (दि.६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात धाड-बुलढाणा मार्गावर घडला. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, नऊ प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. जखमींना बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Buldhana News ST bus accident in Mardadi Ghat 13 passengers injuredसविस्तर असे, की मलकापूर आगाराची बस (क्रमांक एमएच ४०-वाय-५४८१) ही धाडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जात होती. बुलढाणा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मर्दडीच्या घाटात एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे ही बस दरीत कोसळी. सुदैवाने झाडामध्ये ती अडकल्याने मोठी जीवितहानी टळली. या बसमध्ये १३ प्रवासी होते. त्यापैकी चार प्रवासी गंभीर जखमी झालेले असून, नऊ प्रवाशांना किरकोळ मार लागलेला आहे. जखमीमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे. अपघातस्थळी एसटीचे तपासणी पथक, स्थानिक ग्रामस्थांनी व इतर वाहनांतील नागरिकांनी धाव घेऊन मदत व बचावकार्य केले. जखमींना स्थानिक पोलिसांनी तातडीने धाड येथील रूग्णालयात हलवले व नंतर बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे व त्यांचे सहकारी हेदेखील जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते.
या दुर्देवी अपघाताच्या पाच मिनीट अगोदरच एसटीच्या तपासणी पथकाने दुधा गावानजीक या बसची तपासणी केली होती. हे तपासणी पथकाचे वाहन व एसटीबस पाठोपाठ जात असतांनाच मर्दडीच्या घाटात हा अपघात घडला. अपघातानंतर तपासणी पथकाच्या कर्मचार्‍यांनी व स्थानिकांनी तेथे पोहोचत बसचा समोरील काच फोडून जखमींना बाहेर काढले. या अपघातमुळे बसमधील प्रवासी चांगलेच भेदरले होते. दैव बलवत्तर म्हणून थोड्यात निभावले, अशीच प्रतिक्रिया या प्रवाशांनी व्यक्त केली.


मलकापूर आगाराची ही बस मलकापूरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होती. पहाटे ५:५० वाजता बुलढाणा बसस्थानकातून ती धाडच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, मर्दडीच्या घाटातील मुख्य वळणावर ही बस न वळता थेट दरीत घुसली. यादरम्यान बसने एक पलटी घेतली. मात्र घाटातील सागाच्या झाडांमध्ये अडकल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली, व जीवितहानी टळली. शेवटी एका झाडाला ही बस धडकून तेथेच अडकली. या घटनेचा अधिक तपास धाड पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!