– गावातील सलोख्याने जपली हजारो वर्षांची परंपरा
चिखली (एकनाथ माळेकर) – गुरू-शिष्य परंपरा ही हिंदू धर्मात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते, आणि याच गुरूपौर्णिमेनिमित्त ग्राम अंत्री खेडेकर येथे अनंत काळापासून गुरुपूजनोत्सव महाप्रसाद, भजन, कीर्तन, दहीहंडी या धार्मिक कार्यक्रमांनी पिढ्यानिढ्या अविरतपणे साजरा केला जात आहे. या सर्व उत्साहचे मुख्य अधिष्ठान आहे येथील महादेव मंदीर. आणि, विशेष म्हणजे, या शिवमंदीरात एकाच पिंडीवर दोन साळुंका असून, हे भारतातील एकमेव उदाहरण आहे. शिवाय, हे मंदीर जागृत देवस्थान मानले जाते.
गावात शिवपूजन व गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करताना गावातील सर्व नागरिक मग जात, धर्म हा विषय कुठेच येतं नाही. येथील शिवलिंग हे अखंड भारत वर्षात एकमेवाद्वितीय आहे. एकाच पिंडीवर दोन शिवलिंग आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज जेंव्हा चर्चा करतात तेंव्हा ही माहिती पुढे येते की, असे शिवलिंग देशात कुठेच नाही. शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठापना ही गुरू-शिष्य परंपरेतील महर्षी अत्री यांनी केल्याचे ऐकिवात आहे. येथे अत्री ऋषीचा आश्रम होता असं म्हटल्या जाते. मंदिर बांधकाम हे हेमाडपंथी आहे. त्यामुळे ते हजारो वर्षापूर्वीचे असावे. मंदिरापासून काही अंतरावर एक विशालकाय पिपळवृक्ष आज ही ह्या पुरातत्वाची स्पष्टपणे साक्ष देत आहे. पिंपळवृक्ष ते मंदिर परिसरात आता अनेक घरांची बांधकाम झालेले आहेत, पण तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अनेक शिष्याच्या अध्ययन अध्यापन कार्यासाठी हा परिसर वापरात असावा. काळाच्या ओघात मंदिर सभागृहाचे बांधकाम वेळोवेळी लोक सहभागातून अद्ययावत केल्या जात आहे. एक अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून परिसरात श्रद्धा आहे.
आज ही खरे खोटे सिध्द करण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून निवाडा करण्याचा रिवाज असून, हा रिवाज अव्याहतपणे चालू आहे आणि जर एखादा महाभाग पिंडीवर हात ठेवून जर खोटे बोललाच तर त्याचा यथोचित प्रसाद त्याला येणार्या काळात शिक्षा, सजा म्हणून मिळाल्याचे जिवंत दाखले आणि पुरावे गावातील ग्रामस्थांच्या मुखोदगत आहेत. एक सप्ताहभर मंदिरात अध्यात्मिकदृष्ट्या मांदियाळी असते. गावातील लेकी जावई ह्या महाप्रसादाला आवर्जून गावी येत असतात. सर्व समाजासाठी हा एक सण उत्सव असतो. ह्या सर्व समारोहाचा मुख्य पूजेचा मान हा जालना जिल्ह्यातील वडार समाजाच्या एका कुटुंबाकडे आहे. आज ही त्यांची कितवी तरी पिढी येथे सात दिवस वास्तव्यास येऊन राहतात. पंचक्रोशीतील अनेक नागरिक दिंड्या घेऊन येत असतात. लोक सहभागातून हा सर्व खर्च भागविल्या जातो. अशातच २००८ मध्ये मंदिराच्या कळसाचे बांधकाम अद्ययावत केल्या गेले आहे. विश्वस्त मंडळ कायम आहे, त्यामुळे प्रामाणिक कारभार पाहिला जात आहे. महाप्रसादाच्या दुसर्या दिवशी गावातील काही नागरिक वर्षभराचा हिशोब घेतात.
अध्यात्मिकतेचा हा अत्युच्च भाव सामान्य जनतेच्या मनात चिरंजीव आहे. अनेक दुर्धर आजार, व्याधीत महादेवाला अधिष्ठान मानून ते सर्व बरे झाल्याचे आजही बोलल्या जाते. सर्व नागरिकांचा एक अंतर्मनातील चिरंजीव शक्ती, प्रेरणा स्थान हे महादेवाचे मंदिर आहे. या भक्ती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अजूनही एका विशेष व्यक्तीला श्रेय दिल्या गेलं नाही, हे सुध्दा अनेक पिढ्यापासुनचे वैशिष्ट्ये आहे, हे येथे उल्लेखित करणे गरजेचे आहे. सर्व कष्ट गावकरी, सर्व श्रेय गावकरी, प्रत्येक जण आपल्या यथोचित शक्तीने या उत्सवात सहभागी होत असतो. आपले सर्वोत्तम योगदान देत असतो. ही सुध्दा एक विशेष परंपरा मानावीच लागेल.
Leave a Reply