– पोलिस अधीक्षकांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश
चिखली (महेंद्र हिवाळे) – साकेगाव येथे अवैध दारूविक्री खुलेआम सुरू असून, ग्रामस्थांनी सांगूनही हे दारूविक्रेते मुजोरपणे दारू विकत आहेत. त्यांना पोलिस प्रशासनाचे अभय असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज (दि.४) जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा नेला व जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत अवगत केले. पोलिस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील साकेगाव येथे अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून, नागरिक दारु पिऊन धिंगाणा घालत असतात. महिला व अबालवृद्ध दारु विक्री करणार्या मंडळीला वारंवार सांगून कंटाळले आहे. गावातील दारुविक्री करणारे विजय भिवाजी निकाळजे, प्रभाकर महादू निकाळजे, शरद फकीरबा इंगळे, आबेदन बादल पवार, अफसर खा अमीर खा ही मंडळी त्यांचे घरी अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावात खुलेआम दारूविक्री करत असतात. त्यांना पोलीस प्रशासनाचे कोणतेही भय राहिलेले नाही. त्यामुळे साकेगाव व खोर येथील असंख्य महिला व पुरुषांसह दि.४ ऑक्टोबररोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. मागील ४ ते ५ वर्षात गावातील १५ ते १६ तरुणांचा याच दारुमुळे मृत्यू झाला असून, अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाले आहेत. गावातील तरुण, वयस्क मंडळी दारूच्या आहारी जात असून, या अवैध दारूविक्री विरुद्ध वारंवार रायपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार करूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे बेकायदेशीरपणे दारूविक्री करणार्याना पोलीस प्रशासनाचे कोणतेही भय राहिलेले नाही. तरी गावामध्ये सुरू असलेली अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यात येऊन गावांमध्ये दारूविक्री करणार्या व्यक्तीने भविष्यात साकेगाव शिवारात कोठेही दारू विक्री करू नये व दारूबंदी कायम बंदीच रहावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे. त्यावेळी रायपूर पोलीस स्टेशन यांनी दारूबंदीसाठी कोणत्याही प्रकारचे हयगय करू नये. अन्यथा भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास केवळ पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यावेळी महिलांसह शेकडो गावकरी व तरुण मंडळी उपस्थित होते.