चिखली (कैलास आंधळे) – वनविभागाच्या सतर्कतेमुळे आज वन्यजीव घोरपडीला जीवदान मिळू शकले. मेरा बुद्रूक येथे घोरपडीची विक्री करणार्या व्यक्तीला वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ही कारवाई आज (दि.१६) मेरा बुद्रूक फाट्यावर चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.
वनविभागाच्या या कारवाईमुळे वन्यप्राणी तस्करी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. एकीकडे वन्यजीव रक्षक वन्यप्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी व संवर्धन-जतन करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोकांच्या आवडी निवडीसाठी वन्य प्राण्याची शिकार हे शिकारी करत आहे. यासाठी वन्यजीव वाचवायचे असेल तर लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे झाले आहे. आजच्या या कारवाई मध्ये वनविभागाचे घोरपडे, पठाण, वाहन चालक ज्ञानेश्वर भोसले यांनी घोरपड विकणारा व्यक्ती राजू शिंदे रा.दरेगाव तालुका सिंदखेडराजा याला ताब्यात घेतले, वृत्तलिहिपर्यंत त्या व्यक्तीची चौकशी चालू होती. त्याच्या चौकशीतून वन्यप्राणी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
————-