LONARVidharbha

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; पिंपरी खंदारे येथील दुर्देवी घटना

– बिबी पोलिसांकडून कसून शोध सुरू, लवकरच सापडणार?

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – सिंदखेडराजा ते मेहकर रोडवर अज्ञान वाहनाने धडक देऊन पळून गेल्याने ७५वर्षीय वृद्धाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. भिकाजी गंगाराम काकडे (वय ७५) असे या वृद्धाचे नाव आहे. पिंपरी खंदारे गावाजवळ झालेल्या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती.

भिकाजी काकडे हे पिंपरी खंदारे येथील रहिवासी असून, ते संतोष गरकळ यांच्या हॉटेलवर ते रात्रीच्यावेळेस चौकीदाराचे काम करतात. काल (दि.१५) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ते चौकीदारी करण्यासाठी हॉटेलकडे जात असताना, अज्ञात वाहनाने त्यांना गावाजवळ जोराची धडक दिली व पळून गेले. गोविंद चौधर यांच्या शेताजवळ सिंदखेडराजा-मेहकर रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. रात्रीची वेळ असल्याने व आजूबाजूला कुणी नसल्याने या वाहनाचा माग काढता आला नाही. काकडे यांना अज्ञात वाहनाने उडवल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. भिकाजी काकडे यांच्या पश्च्यात तीन मुले व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचा मुलगा संतोष भिकाजी काकडे, रा. पिंपरी खंदारे यांच्या तक्रारीवरून बिबी पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिस या वाहनाचा तांत्रिक तपास करत आहेत. लवकरच वाहनचालकास जेरबंद करू, अशी माहिती ठाणेदार सोनकांबळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली. पुढील तपास ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्टेबल बद्रीनारायण कायंदे व रामप्रसाद चतुर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!