– लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे समन्वयकांचे आवाहन
– पार्किंगसाठी ५ ठिकाणे निश्चित, चार ठिकाणी पाणी व्यवस्था
– अतिविराट गर्दी झाल्यास मोर्चाच्या मार्गात बदल शक्य!
बुलढाणा (गणेश निकम) – जिल्हा मुख्यालय येथे आयोजित १३ सप्टेंबररोजीच्या मराठा मोर्चाचे जय्यत नियोजन पोलीस दलाने केले आहे. जिल्हा पोलीस दलाच्या जोडीला बाहेरून दोन प्लाटून बोलविण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक, सहा पोलिस उपाधीक्षक, यांच्यासह १०० पोलीस निरीक्षक मोर्चावर करडी नजर ठेवणार आहेत. सकाळपासून जिल्हा मुख्यालयी जनसागर उसळणार असून, मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, मराठा आरक्षणासाठी उपोषण छेडणारे मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबास मोर्चासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच जालना जिल्ह्यात झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा मुख्यालयी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन आहे. बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ जिजाऊंचा जिल्हा आहे. मराठा स्पिरिट येथे इतिहास काळापासून आहे. ज्याने देशाच्या प्रमुख सत्तेला धडक दिली, असे शिवराय घडवणारी माता जिजाऊं याच जिल्ह्याची लेकबाळ असल्याने होणारा मराठा मोर्चा अर्थातच भव्य असा राहणार आहे. सन २०१६ साली भव्य मोर्चा ऐतिहासिक ठरला होता. लाखो मराठा कुटुंब अबालवृद्धासह मोर्चात सहभागी झाले होते. हा इतिहास असल्याने प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
बाहेर जिल्ह्यातून पोलीस कुमक
मराठा मोर्चासाठी जिल्हा पोलीस दलाच्या जोडीला बाहेरून दोन एसआरपी प्लाटून बोलवण्यात आल्याची माहिती डीएसबी पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी दिली. पोलीस दलाकडून प्राप्त माहितीनुसार, एक हजार पोलिसांच्या मदतीला सीआरपा,r एसआरपी प्लाटूनदेखील आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. एसपी, डीवायएसपी यांच्यासह १०० पोलीस निरीक्षक मोर्चात राहणार आहेत.
मोर्चात सहभागी व्हावे – समन्वयकांचे आवाहन
अभी नही तो कभी नही अशी अवस्था सध्या आरक्षणाबाबत झाली आहे. आरक्षणाची लढाई आरपार मुद्द्यावर आली आहे. त्यामुळे मराठा समाजाने कुटुंबासह हजेरी लावावी, असे आवाहन समयान्वयकांनी केले आहे. १३ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे मराठा क्रांती मोर्चाचे भव्य आयोजन आहे.
‘जरांगे पाटलांचे कुटुंबीय’ आकर्षण, मोर्चात होणार सहभागी!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण छेडले आहे. त्यांचे उपोषणाने राज्य सरकारची झोप उडाली आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जरांगे पाटील हे नाव घुमत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बुलढाणा येथील क्रांती मोर्चात बोलवण्यासाठी समन्वयकांनी प्रयत्न सुरू केले असून, राज्याचे आकर्षण असलेले हे कुटुंब बुलढाण्याच्या मराठा क्रांती मोर्चा सहभागी झाल्यास या मोर्चाची उंची अर्थातच वाढणार आहे. प्राप्त माहितीनुसार, जरांगे पाटील यांची मुलगी मोर्चात संबोधित करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
छत्रपती संभाजी राजेंची उपस्थिती शक्य!
मागील मराठा क्रांती मोर्चात छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थिती लावली होती. कुठलाही गाजावाजा न करता विशाल मराठा मोर्चात राजे एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे सहभागी झाले होते. यंदाचे मोर्चात ते सहभागी होतात की कसे, याबाबत संभ्रम आहे. जरांगे पाटील कुटुंबीय मात्र यामध्ये सहभागी होणार आहे.