कालपासून पाणीही त्यागले, आज सलाईनही काढले; जरांगे-पाटलांच्या प्रकृतीची काळजी वाढली!
– मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ घेऊन या, तरच उपचार घेतो; जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावले!
– मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी बोलावली सर्वपक्षीय बैठक
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणांतिक उपोषण सुरूच ठेवले असून, यापूर्वीचे राज्य सरकारने दोन्ही जीआर (शासन निर्णय) त्यांनी फेटाळून लावले आहेत. आज (ता.११) त्यांच्या उपोषणाचा १४वा दिवस आहे. गेल्या चोवीस तासांपासून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला असून, आजपासून त्यांनी सलाईनही काढून टाकत, सरकारकडून वैद्यकीय उपचार घेण्याचे नाकारले आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या, तरच उपचार घेतो, असे त्यांनी सरकारला ठणकावले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, ओबीसींवर अन्याय होणार नाही, त्यांच्यात कुणी वाटेकरी होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली आहे. दोन्हीही समाजाचा विचार करून या बैठकीत निर्णय होईल, असेही फडणवीस म्हणालेत. तसेच, ‘ओबीसीवरही अन्याय करू नका, आणि आमच्यावरही अन्याय करू नका, समन्वयाने तोडगा काढा, पण आम्हाला न्याय द्या’, अशी विनंती मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
मराठा आरक्षणाचा तिढा मार्गी लावण्यासाठी सरकारने आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार? याची माहिती फडणवीसांनी दिली. ‘सरकार, विरोधी पक्षाने मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. आजच्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे, की कोणत्या मार्गाने पुढे जाता येईल. मराठा समाज असेल किंवा विविध समाजाचे प्रश्न समोर येत आहेत. मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आले आहेत. इतरही मराठा समाजच्या संघटनांच्या मागण्या आहेत. या सर्व मागण्यांचा नीट एकत्रित विचार करून यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा विचार केला जाईल’, असे फडणवीस म्हणाले. ‘आमचं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींमध्ये जी भीती आहे की त्यांचं आरक्षण कमी होणार, अशा प्रकारे सरकारचा कोणताही हेतू नाही. ओबीसी समाजाने गैरसमज करून घेऊ नये. दोन समाज समोरासमोर यावेत असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही. कोणत्याही समाजातील नेत्याने कोणतंही स्टेटमेंट करताना कोणता समाज दुखावणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. ओबीसी समाजालादेखील आश्वासित करू इच्छितो की ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही’, असा दिलासाही फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण हे टिकणारे असले पाहिजे, कायद्याच्या चौकटीत त्याला बाधा येऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यासाठीच सर्वांना बैठकीला बोलवले असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल, यासाठी विरोधकांनी सूचना दिल्या पाहिजेत, एवढीच आमची आपेक्षा असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छावा संघटनाही आक्रमक झाली आहे. मराठा आरक्षणाची लढाई आरपारची आणि शेवटची आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना वेळ पडली तर हातात दंडुके घेऊन रस्त्यावर उतरेल अशी भूमिका संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी मांडली आहे. तसेच, महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर मराठ्यांना आरक्षण द्या. अन्यथा आम्ही एकवळे रामदास आठवले यांना मदत करू, पण मराठा नेत्यांना निवडणुकीत पराभूत करूनच दम घेऊ, असा निर्वाणीचा इशारा मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाविरोधात उपोषण करणार्यांचा बोलवता धनी कोण आहे? मी कुणाचेही नाव घेणार नाही. पण थोडक्यात सांगतो. त्यांची सर्व सूत्रे नागपुरातून हलतात, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे आणि मराठवाड्यातील मराठा समजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे, या मागणीक्रता मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण धरले आहे. आज उपोषणाचा १४ दिवस आहे. गेल्या १४ दिवसांत बर्याच घडामोडी घडून गेल्या. शांततेत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी १ सप्टेंबररोजी लाठीमार केला. या लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. या लाठीमारामुळे मराठा समाज आणखी पेटून उठला. तसेच, यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणालाही बळ मिळाले. अनेक राजकीय नेते, पुढारी त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन आले. मराठा समाजाचाही पाठिंबा त्यांना दिवसेंदिवस वाढत गेला. या काळात सरकारने तीनवेळा त्यांचे शिष्टमंडळ जालन्यात जरांगेंशी चर्चा करण्याकरता पाठवले. परंतु, सरकार जीआर काढत नाही तोवर माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली.
उपोषणस्थळी जरांगे-पाटील निपचीत पडून!
दैनंदिन तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला तपासणी करण्यास मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला. जरांगे यांच्याकडून पाण्याबरोबरच औषधही बंद असताना आता तपासणीदेखील बंद केल्याने समर्थकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज सरकारने काहीतरी ठोस पावले उचलावी, अशी मागणी समर्थक करत आहेत. मनोज जरांगे यांनी अन्नपाणीत्याग आणि सलाईन बंद केल्याने शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढती गर्दी, दोन-तीन दिवस पाऊस पडल्यानंतर जाणवणारा उकाडा, यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागले आहेत. मात्र खुद्द जरांगेंनी आपली प्रकृती चांगली असल्याचा दावा केला आहे. ‘उपचारासही नकार दिल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती आता गंभीर होत चालली असल्याने चिंता वाढली आहे. कालपासून पाणी न पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, ब्लड शुगरची पातळी कमी होण्याचे धोके आहेत, मात्र तपासणी केल्याशिवाय माहिती देता येणार नाही,’ असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Devendra Fadanvis is an enemy of Maratha community, he ordered a Lathicharge on the silent protesters. He should resign right now – Manoj Jarange Patil pic.twitter.com/GWxItHQG3n
— Abhay 👔 (@xavvierrrrrr) September 3, 2023