पीपल्स एज्युकेशन सोसायटी वाचविण्यासाठी १३ सप्टेंबरला औरंगाबाद येथे भव्य मोर्चा
बुलढाणा (संजय निकाळजे) – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली मातृसंस्था म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. या सोसायटीतील वादाचा गैरफायदा घेत संस्थेचे कथित विश्वस्त यांनी संस्था भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती देण्याचा घाट घातला आहे. म्हणून सदर संस्था वाचविण्यासाठी १३ सप्टेंबररोजी भव्य मोर्चाचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. या मोर्चात मिलिंद महाविद्यालय औरंगाबादच्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी विद्यार्थी प्रबोधनकार गजाननदादा गवई तसेच माजी विद्यार्थी गायक पत्रकार संजय निकाळजे यांनी केले आहे.
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय मैदानावरून हा मोर्चा सकाळी ११ वाजता निघणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेला संघाच्या दावणीला बांधणारे एस. पी. गायकवाड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, संस्थेचे धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई व न्यायालयातील सर्व प्रलंबित खटले निकाली काढून संस्था वादमुक्त करावी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयात एस. पी. गायकवाड यांनी प्राचार्यकरवी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, नागसेन वनातील संस्थेच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, संस्थेच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांच्या रिक्त जागा विशेष भाग म्हणून तात्काळ भरण्यात याव्या, संस्थेच्या इमारतीच्या विकासाचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून तात्काळ निधी देण्यात यावा, मिल कॉर्नर ते मिलिंद चौक ते विद्यापीठ गेट पानचक्की ते डॉ आंबेडकर लॉ कॉलेज मार्गासाठी संस्थेची अधिग्रहित केलेल्या जागेसमूहातला म्हणून डीएमआयसीतील शैक्षणिक प्रदेशासाठी राखीव शंभर एकर भूखंड संस्थेला देण्यात यावा, सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत स्वतंत्र हेड निर्माण करून पीएसच्या वस्तीगृहासाठी निधी देण्यात यावा, पीइएसच्या शाळा महाविद्यालयाचे शिक्षकेतर अनुदान फंड विना विलंब देण्यात यावे. इत्यादी मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आपला लढा हस्तकांना, फिटळण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त, हुकुमशाहीमुक्त, अतिक्रमण मुक्त वादग्रस्त पेपर एज्युकेशन सोसायटीचे हितासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मिलिंद महाविद्यालयाच्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी या मोर्चा सहभागी व्हावे, असे आवाहन मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचे माजी विद्यार्थी प्रबोधनकार गजानन दादा गवई तसेच माजी विद्यार्थी गायक पत्रकार संजय निकाळजे यांनी केले आहे.