– चिखली तालुक्यातील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांसह ‘एलसीबी’समोर मोठे आव्हान!
चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यात माेबाईल चाेरट्यांचा सुळसुळाट झाला असून, विविध गावांच्या आठवडी बाजारात हे चाेरटे सक्रीय झाले आहेत. अंढेरा पाेलिस ठाणेहद्दीतील मेरा बुद्रूक गावात तर या चाेरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व पाेलिस काय करतात, याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त हाेत आहे. विशेष बाब म्हणजे, अंढेरा पाेलिस ठाण्यात माेबाईल चाेरीची तक्रार देण्यास कुणी गेल्यास तेथील कर्मचारी तक्रारकर्त्यालाच दमदाटी करतात. असाच प्रकार पत्रकारासाेबत घडला असता, ठाणेदारांनी संबंधित पाेलिस कर्मचा-याला चांगलेच फटकारून काढले.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक गावाच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून, या गावात शनिवारी आठवडी बाजार भरत असतो. या बाजारातून दिनांक ९ सप्टेंबररोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्यादरम्यान सुधाकर कुमठे व इतरांचे एक ते दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. अंढेरा पोलिस ठाण्यातील पूर्वीचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या कार्यकाळात मोबाईलचोरीचे प्रमाण बंद झाले होते, त्यांनी या चोरांना चांगलेच वठणीवर आणले होते. परंतु, ठाणेदार हिवरकर यांची बदली झाली आणि त्यांच्याजागी अंढेरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी विकास पाटील आले. नवीन ठाणेदार येत नाही तोच मोबाईल चोरटे सक्रिय झाल्याचे अनेक घटनेवरून दिसून येत आहे. अनेक महिन्यांपासून आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला असून, पोलिसांचा कोणताही वचक सध्या तरी त्यांच्यावर दिसून येत नाही. मोबाईलधारक सुधारक कुमठे यांचा मोबाईल चोरट्याने पसार केल्यानंतर अनेक ठिकाणी शोधाशोध स्वतः घेतला असता मोबाईल कुठेही मिळून नाही आल्यामुळे त्यांनी थेट अंढेरा पोलीस स्टेशन गाठले. मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच त्यांना व त्यांच्यासोबतच्या पत्रकाराला पोलीस कर्मचार्यांकडून दमदाटी करण्यात आली. फिर्याद घेणे तर दूरच या पोलीस कर्मचार्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या प्रकारसुद्धा यावेळी घडला. नेमके त्याचवेळी ठाणेदार विकास पाटील त्या ठिकाणी हजर झाले असता, त्यांनी तक्रारकर्त्याची बाजू ऐकून घेऊन, तक्रार दाखल करून घेतली व मोबाईल हरवल्यानंतर कोण कोणत्या गोष्टी मोबाईलधारकाने कराव्या ह्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. तसेच, फिर्यादी व पत्रकार यांच्याशी उद्धटपणे वागणार्या पोलिसालाही त्यांनी चांगलेच फटकारले व नागरिकांशी सौजन्याने वागण्याची ताकीद दिली.
मी अंढेरा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक चोरीच्या घटनेला आळा घातलेला आहे. मेरा बुद्रूक येथील आठवडी बाजारातून चोरटे मोबाईल लंपास करत असल्याची घटना घडल्याची पहिल्यांदाच पोलीस स्टेशनला तक्रार आली आहे. त्यामुळे या मोबाईल चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावू. तसेच तक्रारकर्ते व पत्रकाराला पोलीस कर्मचार्याकडून झालेली वागणूक ही निंदनीय आहे. याच्यानंतर पोलीस कर्मचार्याकडून होत असलेले असे प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही.
– विकास पाटील, ठाणेदार, अंढेरा पोलीस स्टेशन
मेरा बुद्रूक येथील आठवडी बाजारातून होत असलेल्या मोबाईल चोरीच्या घटनेमुळे सर्व सामान्यांतून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बाजारात भाजीपाला खरेदी करताना किंवा पैसे देतानाची संधी साधुन चोरटे मोबाईल लंपास करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागतोय. यापूर्वीही अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. या बाबत पोलिसांत तक्रारदेखील दिली. मेरा बुद्रूक आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातील शेतकरी भाजीपाला, कृषी उत्पादने विक्रीसाठी आणतात. ताजा आणि चांगला भाजीपाला माफक दरात मिळतो म्हणून शेजारील गावातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात आणि आपला मोबाईल फोन हरवून बसतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्तातला भाजीपाला खरेदीच्या नादात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. पोलिसांनी या आठवडी बाजारातील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.