BuldanaBULDHANACrimeHead lines

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा शहराध्यक्षावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न!

– बुलढाणा शहरात खळबळ, एका हल्लेखोरास पकडण्यात यश

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्या काल रात्री खुनीहल्ला करण्याचा प्रयत्न झाला. बावस्कर यांच्या डोक्यात रॉड घालून त्यांचा भररस्त्यावर खून करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. परंतु, बावस्करांच्या सावधपणामुळे हा प्रयत्न उधळला गेला असून, एका हल्लेखोरास पकडण्यात यश आले आहे. हल्लेखोर हे तोंड बांधून आले होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याचे पाहून ते पळून गेले. शहरातील जयस्तंभ चौकात हा धक्कादायक प्रकार घडला. पकडलेल्या हल्लेखोराची कसून चौकशी सुरू असून, बुलढाणा पोलिसांनी गुन्हे दाखल करून तातडीने तपास चालविला होता.

अनिल बावस्कर यांची शहरातील जयस्तंभ चौकात इडली-डोसाची हातगाडी आहे. रात्री नऊ वाजताच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या तिघांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकण्याचा प्रयत्न केला. पण बावस्कर सावध असल्यामुळे बचावले. त्यांनी वरच्यावर रॉड पकडून हल्लेखोरास जोरदार लाथ मारली. तोपर्यंत आजूबाजूचे व्यावसायिक बावस्कर यांच्या मदतीला धावले. या हल्लेखोराला पकडून त्याला चोप देण्यात आला. मात्र त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर हल्लेखोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. हा हल्लेखोर जालना येथील असल्याचे समजते.
या हल्ल्याची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस तसेच जाकीर कुरेशी, सत्तार कुरेशी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले होते. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बावस्कर एक प्रामाणिक व्यावसायिक असून, सक्रिय पदाधिकारी आहेत. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या बावस्करांवर हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. बुलढाणा पोलिस अधिक तपास करत आहेत.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!