– पातोंडा (पेडका) येथील मुरलीधर बघे यांचे दोन एकर सोयाबीन अचानक जळाले!
खामगाव (भागवत राऊत) – तालुक्यातील शेतकर्यांचे सोयाबीन पीक पिवळे पडून जळत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पातोंडा (पेडका) येथील मुरलीधर बघे या शेतकर्याचे दोन एकरातील पीक अशा प्रकारे जळाल्याने या शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तातडीने या परिसरातील सोयाबीन पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
खामगाव तालुक्यातील पातोंडा (पेडका) येथील शिवारात मुरलीधर ओंकार बघे (वय ६०) रा. अटाळी यांनी गट क्रमांक १०५ मध्ये दोन एक्कर सोयाबीनच्या पिकाची पेरणी केली होती. दोघे पती – पत्नी मिळून रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतात. सोयाबीनचे पीकही सुरवातीला चांगले होते, मात्र गेल्या पंधरा वीस दिवसात अचानक उभे असलेले सोयाबीन पीक पिवळे होवून जळत आहे. आधीच दोन एक्कर सोयाबीनला पंचवीस ते तीस हजार खर्च आला अन आता उभे पीक जळत असल्याने हाती काहीच येणार नसल्याने आपण करावे काय ही चिंता मुरलीधर बघे यांच्यावर आली आहे. बघे यांनी पिवळे झालेले सोयाबीन जळत असल्याने त्यावर कीटकनाशके, खत फवारणी केली मात्र तरीही कुठलाच फरक पडला नाही. बघे यांनी पीक विमा काढला आहे. त्यांच्याशेतातील सत्तर टक्के सोयाबीन हे जळाले आहे. त्यामुळे संबंधित पीकविमा अधिकारी, कृषी अधिकारी यांनी पंचनामा करून मुरलीधर बघे यांना झालेल्या नुकसानाची आर्थिक मदत द्यावी. शेजारी असलेल्या सुरेश महादेव जाधव यांचेही शेतात अशाच प्रकारची परिस्थिती आहे. तसेच, परिसरातील शेतकर्यांचेही पीक पिवळे पडून जळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.