बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीची ३१ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. ग्रामस्थांकडून प्रशासनाला जाब विचारले जाऊ शकतात. अनेक मुद्द्यांवर ही ग्रामसभा गाजण्याची शक्यता असून, सर्वांच्या नजरा या ग्रामसभेकडे लागल्या आहेत.
बुलढाणा तालुक्यातील रायपूर ही १५ सदस्य असलेली एक मोठी ग्रामपंचायत आहे. रायपूरचा तालुका हा बुलढाणा आणि मतदारसंघ चिखली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामासाठी बुलढाणा आणि राजकीय कामाच्यादृष्टीने चिखलीशी संबंध येतो. बर्याचदा ही विभागणी गावकर्यांना डोकेदुखी ठरते. इथली ग्रामपंचायत म्हणायला मोठी असली तरी उत्पन्नाचे स्रोत नसल्याने तिजोरीत खडखडाट असतो. त्यामुळे विकासकामे करतांना शासकीय अनुदानावर अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायतीने स्वतःचे ठोस उत्पन्नाचे साधन निर्माण करणे गरजेचे आहे. ग्रामसभेत या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे. पंचायतराजमध्ये ग्रामसभेला खूप महत्व आहे. गावच्या विकासाच्या अनुषंगाने ग्रामसभेचे निर्णय महत्वाची भूमिका बजावू शकतात. साधारणपणे एका वर्षात किमान चार ग्रामसभा बंधनकारक आहेत. यामध्ये १५ ऑगस्ट, १ मे, २ ऑक्टोबर आणि २६ जानेवारी या ग्रामसभा घेणे सरपंच व ग्रामसेवक यांना बंधनकारक आहेत.
हे मुद्दे गाजणार..!
रायपूर गावात अनियमित पाणीपुरवठा ही सर्वात मोठी समस्या आहे. नळाला पाणी यायला महिना लागतो. त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड नाराज आहेत. याशिवाय, रस्ते, नालेसफाईचे तीनतेरा वाजलेले आहे. गावातील नाल्या कधी साफ केल्या जातात कोण जाणो. स्मशानभूमीची अवस्था दयनीय आहे. तिथे जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळ्यात फार गैरसोय होते. गावात अनेक गटारे तुंबलेले आहेत. औषध फवारणी नियमित होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सचिवाच्या उर्मटपणाबद्दल नाराजीचा सूर!
चार दिवसांपूर्वी गावातील मागासवर्गीय समाजातील एका अंत्ययात्रेस गटारातून मार्ग काढत जावे लागले होते. याबाबत संबंधित वार्डाचे ग्रा. पं. सदस्य समाधान घाडगे यांनी ग्रामविकास अधिकारी भास्कर बाहेकर यांना फोन केला होता. गटार दुरुस्तीबाबत विचारणा केली होती. मात्र बाहेकर यांनी त्यांना उर्मटपणे उत्तरे दिली होती. त्यामुळे त्यांच्याबाबत नाराजीचा सूर असून, या प्रकरणावर ग्रामसभेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
————