‘बापूं’च्या धिरोदात्तपणामुळे तणाव निवळत कोलकत्यात साजरा झाला पहिला स्वातंत्र्यदिन!
वर्धा (प्रकाश कथले) – दिल्लीत पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोशाची उत्साहात तयारी सुरू असताना कोलकत्यात १४ ऑगस्टरोजी तणावपूर्ण परिस्थिती होती. माजी मुख्यमुंत्री सुर्हावर्दी यांच्या अंगाावरच जमाव चालून येण्याच्या तयारीत होता. त्यावेळी बापू (महात्मा गांधी) कोलकत्यात होते. प्रार्थनेनंतर बापू झपझप पावले टाकीत एका खोलीत बसलेल्या माजी मुख्यमंत्री सुर्हावर्दीच्या खांद्यावर हात ठेवला आणि बापू दोन्ही जमावाच्या समोर गेले. बापूंच्या या पवित्र्याने कमालीची शांतता पसरली. बापू म्हणाले, शांतता प्रस्तापित करण्याकरीता सुर्हावर्दींना सहकार्य द्यायचे कबूल केले आहे. तुम्ही जर मला स्वीकारता, तर सुर्हावर्दींना स्वीकारलेच पाहिजे. बापूंच्या धिरोदात्त उद्गाराने वातावरण बदलले आणि कोलकता येथील पहिला स्वातंत्र्यदिन परस्परांविरोधात उभ्या ठाकलेल्या दोन्ही समाजातील नागरिकांनी उत्साहाने साजरा केला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात या अमृतकणांचीे मौलिकता अधिक समोर आले आहे.
एरव्ही सुर्हावर्दी बापूंचे कट्टर विरोधक होते. बापूंचा खांदावर हात असलेले सुर्हावर्दी जमावासमोर उभे होते. जमावातील एका तरुणांनी विचारले, मागील वर्षी कोलकत्यात जो हिंसाचार झाला, त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारता काय, सुर्हावर्दींनी लगेच उत्तर दिले, होय, मीच त्याला जबाबदार आहो. मला आता त्या कृत्याची लाज वाटते. बापू काही क्षणानंतर म्हणाले, तोच खरा आणीबाणीचा क्षण होता. वातावरण निवळण्याकरीता चुकांचा कबुलीजबाब देण्यासारखा दुसरा श्रेयस्कर मार्गच नाही. त्या क्षणीच मुख्यमंत्री सुर्हावर्दी जिंकले होते. त्यानंतर काही वेळातच बातमी आली, कोलकत्यात परस्परांविरुद्ध उभे ठाकलेले दोन्ही समाज एकत्र येऊन हातात राष्ट्रध्वज घेऊन फडकवित आहेत. हे ऐकल्यानंतर जमाव आनंदाच्या आरोळ्या ठोकतच निघून गेले. ब्रिटिश क्वेकर पंथाचे सक्रीय सेवक असलेल्या होरेस अलेक्झांडर, या इंग्रज गृहस्थाने हे सारे लिहून ठेवले आहे. होरेस अलेक्झांडर बापूंच्या सहवासात पहिल्यांदा १९२८ मध्ये आले होते. त्यानंतर ते अनेकदा एकत्र आले. त्यानंतर त्यांनी गांधी थ्रू वेस्टर्न आईज, हे बापूंचे चरित्रपुस्तक लिहिले. कोलकत्यातील पहिला स्वातंत्र्यदिन होरेस अलेक्झांडर यांनी पाहिला होता. गांधीजींनी त्यावेळी काढलेल्या शांतिमार्चच्या माहितीवर आधारित लेख त्यांनी न्यूयार्कच्या एका मासिकात लिहून याची माहिती पाश्चात्य जगताला दिली होती. त्यातून होरेस अलेक्झांडर यांनी हा प्रसंग मांडला आहे.
१४ ऑगस्टला होरेस अलेक्झांडर बापूंसोबत कोलकता येथे आले होते.त्यामुळे त्यांनी कोलकता येथील या प्रसंगाचे वर्णन अधिकारवाणीने केले. होरेस अलेक्झांडर लिहितात, कोलकता येथे १४ ऑगस्टला प्रार्थना सभा झाली होती.सभेला बंगालचे माजी मुख्यमंत्री सुर्हावर्दी उपस्थित नव्हते.सुर्हावर्दी, अलेक्झांडर आणि एक पोलिस असे,तिघेच एका घरातील खोलीत बसून होते. सुर्हावर्दीच्या विरोधातील जमावाच्या घोषणा, जमावाची सुर्हावर्दींवर चाल करण्याची मानसिकता तणावात भर टाकणारीच होती. होरेस अलेक्झांडर यांनी खिडक्याची तावदाने लावून घेतली होती. सुर्हावर्दींना शांतता प्रस्तापित करण्यास सहकार्य करण्याचे बापूंनी मान्य केले होते.प् ाण त्यांनीच प्रार्थना सभेला उपस्थित राहण्याचे टाळल्याने जमाव संतापला होता. पण बापूंच्या धैर्याने,सत्यावरील विश्वासाने जमाव शांत झाला. याच धैर्याने बापू सुर्हावर्दीच्या खांद्यावर हात ठेवून जमावासमोर गेले होते. बापूंना एरव्ही नौखालीला जायचे होते.तेथील हिंसाचाराने बापू अस्वस्थ होते. फाळणीनंतर नौखाली पूर्व पाकिस्तानात समाविष्ट होणार होते. बापूंनी नौखालीच्या हिंदूंना ते १५ ऑगस्टला नौखालीत राहतील, असे वचन दिले होते. त्याकरीताच बापूंनी ११ ऑगस्ट १९४७ रोजीच कोलकत्याकडे जाण्यास कूच केले होते. कोलकत्यात येताच काही मुस्लिम नेत्यांनी बापूंना नौखालीत न जाण्याचा सल्ला देत इथेच कोलकत्यात राहून शांतता प्रस्तापित करण्याचा आग्रह केला होता.या घटना नमूद आहेत.
बापू म्हणायचे…
१५ ऑगस्ट हा पहिला स्वातंत्र्यदिन निव्वळ आनंदोत्सव होऊ नये, खेड्यातील लक्षावधी नागरिकांना इच्छा असूनही पोटभर अन्न मिळत नाही. पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी आपण गरीब तसेच भुकेल्या जनतेला विसरता कामा नये. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी आपण देवाची करुणा भाकली पाहिजे. त्याचे आशीर्वाद मागितले पाहिजे, धैर्य आणि शहाणपणा दे, असे विनविले पाहिजे. बापूंचा हा सल्ला सध्या त्यांच्या तसबिरीसोबतच आम्ही खुंटीवर टांगून तर ठेवला नाही ना!