मेहकर (अनिल मंजुळकर) – भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन तालुक्यातील गोमेधर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त माजी सैनिकांचा भावपूर्ण सन्मान सोहळा पार पडला. या सत्काराने हे माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले होते. यावेळी कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सौ.दीपाली अवसरमोल, उपसरपंच अनिल मंजुळकर, ग्रामसेवक देवानंद भारस्कर यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आज जगभरात थाटामाटात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. अशातच शासनाने सर्व ग्रामपंचायतींना कोनशिला तयार करण्याचे आदेश देऊन सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या गावांमध्ये कोनशिला तयार केली. आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा थोर व्यक्तींना विनम्र अभिवादन करण्यात आले व माजी सैनिकांचा सत्कारही समारंभपूर्वक करण्यात आला. आजादी का अमृत महोत्सव ग्रामपंचायत गोमेधर येथे पार पडला. ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सरपंच सौ. दीपाली सुभाष अवसरमोल यांच्याहस्ते पार पडला. यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. माजी सैनिकाच्या पत्नी श्रीमती सावित्रीबाई बापूराव मंजुळकर यांचा सरपंच दीपाली अवसरमोल यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. माजी सैनिक प्रदीप प्रल्हाद चव्हाण यांचा सत्कार तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सुर्वे यांनी सत्कार केला व हरी मंगू चव्हाण यांचा सत्कार ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल मंजुळकर यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक देवानंद नारायण भारस्कर, माजी सरपंच सुरेश सरदार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष अवसरमोल, राजू होणे, अनिल खरात, किसना इंगळे, किशोर अवसरमोल, वकील श्याम काळे, भगवान अवसरमोल व गावातील नागरिक उपस्थित होते.