नियमित ग्रामपंचायत करभरणा करणार्या आदर्श महिलेच्याहस्ते मिसाळवाडीत ध्वजारोहण!
– सैन्यात सेवा देऊन राष्ट्रसेवा करणार्या माजी सैनिकांचाही गौरव
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या मिसाळवाडी येथील ग्रामपंचायतीने आज, १५ ऑगस्टरोजी ग्रामपंचायतीचा सर्व करभरणा करून ग्रामविकासात महत्वपूर्ण वाटा उचलणार्या जबाबदार ग्रामस्थ तथा आदर्श महिला कमलबाई प्रकाश कोलते यांच्याहस्ते ध्वजारोहण करून भारताचा ७७ वा स्वातंत्रदिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. यानिमित्ताने या ग्रामपंचायतीने राज्यात आणखी एक नवा आदर्श असा पायंडा निर्माण केला आहे. नियमित करभरणा करणार्या कमलाबाई कोलते यांचा ग्रामसेविका भूमिका इंगळे यांच्याहस्ते यावेळी सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. तर सायंकाळी भारतीय लष्करात सेवा दिलेल्या माजी सैनिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
मिसाळवाडी हे चिखली तालुक्यातील शांतताप्रिय व आदर्श असे गाव आहे. या गावाने आपली ग्रामपंचायत बिनविरोध केलेली असून, त्याबद्दल थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कौतुकदेखील केले होते. तसेच, राज्यात सर्वाधिक मुलींचा जन्मदर असल्याने मिसाळवाडी गावाचा तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सन्मानही केला होता. प्रशासन, पत्रकारिता, सिनेमा, उद्योग, कृषी व शिक्षण या क्षेत्रात मिसाळवाडी गावाच्या भूमिपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाने गावाचा नावलौकिक राज्यस्तरावर वाढविलेला आहे. यावर्षी ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मिसाळवाडी ग्रामपंचायतीने नवा आदर्श प्रस्तूत करत, शंभरटक्के व नियमित ग्रामपंचायतीचा करभरणा करणार्या आदर्श महिलेची ध्वजारोहणासाठी निवड केली गेली. त्यानुसार, कमलाबाई प्रकाश कोलते यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, ग्रामसेविका भूमिका इंगळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रामस्थांनी आपला करभरणा नियमीत करावा, असे आवाहनदेखील सरपंच व उपसरपंच यांनी केले. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी मिसाळवाडी ग्रामस्थांच्यावतीने भारतीय लष्करात सेवा दिलेल्या माजी सैनिकांचा गौरव सोहळा, व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
———–