अजितदादांच्या ‘मुख्यमंत्री’पदाची ‘हवा पुन्हा गरम’!
मुंबई (खास प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांपासून लपून त्यांचे काका तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली असली तरी, आता ही भेट गोपनीय राहिली नाही. खुद्द शरद पवार यांनीच ही भेट झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, ही भेट भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न असावा, असा सूर राजकीय वर्तुळात उमटला आहे. शरद पवार जे बोलतात, त्याचा नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो. सांगोल्यात बोलताना पवारांनी काही ‘हितचिंतक’ व अजितदादा हे भाजपसोबत येण्यासाठी आग्रह धरत असल्याचे सांगितले होते. परंतु, आपली विचारधारा त्या चौकटीत बसत नाही, असे पवार म्हणाले होते. याचा अर्थच असा होतो, की अजितदादांना ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद दिले गेले तर ते भाजपसोबत गेलेल्या गटाला आपली सहमती देऊ शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सद्या अचानक तब्येत खराब झाली असून, काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) यांनी परस्परांशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती निश्चित करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली, तर या कार्यक्रमानंतर लगेचच अजित पवार हे लपूनछपून शरद पवारांच्या भेटीला एका उद्योगपतीच्या घरी पोहोचले. ही भेट गोपनीय रहावी, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, अजितदादा हे उद्योगपती चोरडिया यांच्या घरी गेले असल्याचे ‘एका नेत्याने’च मीडियाला संकेत दिले; आणि दादांच्या इराद्यावर पाणी फेरले गेले. दरम्यान, अवघ्या नऊ महिन्यांवर आलेली लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभेची निवडणूक पाहाता, या निवडणुका अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढविल्या जाव्यात, अशी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची इच्छा असल्याचे राजकीय सूत्राचे म्हणणे आहे. तसेच, १० तारखेनंतर मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असेही ठरले होते, असेही सांगण्यात येते. परंतु, अद्याप अजितदादा काही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले नाहीत. त्यामुळे अजित पवार गट नाराज असल्याचीही चर्चा असून, याबाबत ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे, जयंत पाटील यांच्या भावाला इडीची नोटीस आली आहे. त्यामुळेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडी पाहाता, शरद पवार यांनीच अजित पवारांना बोलावून घेतले असावे, अशी माहितीही सूत्राने दिली.
दरम्यान, १५ ऑगस्टनंतर राज्यात खुर्चीबदल होण्याची शक्यताही राजकीय सूत्र व्यक्त करत असून, अजित पवार यांना ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री बनविले जाऊ शकते. तर एकनाथ शिंदे यांची केंद्रात वर्णी लागेल. या घडामोडीनंतर जयंत पाटलांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी काही आमदार अजित पवार गटात जातील, असेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे शरद पवार यांनी भाजपला जाहीररित्या पाठिंबा दिला नसला तरी, शरद पवार व ठरावीक नेते हे महाविकास आघाडीत; तर अजित पवार व मोठ्या संख्येने आमदार, खासदार, आणि नेते भाजपसोबत राहतील, असेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. पुढील विधानसभा व लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आणि भाजपविरोधातही लढण्याची शक्यता आहे, असेही सूत्राने सांगितले.
सरकारमध्ये शीतयुद्ध…?
राज्यातील सत्तेत कॅबिनेट मंत्रिपदांच्या वाटपात अजित पवार गटाला वाटा मिळाला असला तरी, अद्याप पालकमंत्रीपदांचे वाटप झालेले नाही. अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्रीपद हवे असून, तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील हे पालकमंत्री आहेत. त्यामुळे सरकारने १५ ऑगस्टरोजी ध्वजारोहणासाठी चंद्रकांतदादांचे नाव जाहीर केले. परंतु, अजितदादा पवार याबाबत नाराज झाल्यानंतर तेथे नेहमीप्रमाणे राज्यपालांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये छगन भुजबळ हे ध्वजारोहण करण्याच इच्छुक होते. परंतु, त्यांना नाशिकऐवजी अमरावती देण्यात आले. तर, गुलाबराव पाटील हे बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत; तेथे बुलढाण्यात अजितदादा गटाचे अनिल पाटील यांना ध्वजारोहणास पाठविण्यात आले आहे.
———–