Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना ‘रावणा’शी!

– राहुल गांधी यांचे मणिपूर हिंसाचारावरून लोकसभेत घणाघाती भाषण

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – मणिपूर राज्यातील नृशंस हिंसाचार व महिलांची निघालेली नग्नधिंड याप्रश्नावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. आपल्या ३५ मिनिटांच्या घणाघाती भाषणात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. पंतप्रधान मोदी यांना तर त्यांनी चक्क रावणाची उपमा दिली. ते म्हणाले, ‘मोदीजी मणिपूरचा आवाज ऐकत नाहीत, ते त्यांच्या मनाचेही ऐकत नाहीत. ते फक्त दोनच लोकांचे ऐकतात. एक अमित शाह व दुसरे अदानी. रावणही दोनच लोकांचे ऐकत होता, एक मेघनाद व दुसरा कुंभकर्ण’. राहुल गांधी यांच्या घणाघाती भाषणानंतर लोकसभेत एकच गोंधळ उडाला. त्यांची भाजप खासदार स्मृती इराणी यांच्याशी चकमकही उडाली. तर, स्मृती इराणी यांनी राहुल यांनी आपल्याला फ्लाइंग किस दिल्याचा आरोप करत, वेगळाच मुद्दा उपस्थित केला. याबाबत भाजपच्या महिला खासदारांनी अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. तर हा मुद्दा भरकटविण्याचा भाजपचा किळसवाणा प्रकार असल्याची टीका काँग्रेसने सभागृहाबाहेर केली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर दाखल अविश्वास प्रस्तावावर संसदेत घणाघाती चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी तब्बल ३५ मिनिटे घणाघाती व अत्यंत अभ्यासू असे भाषण करून मोदी सरकारला आरसा दाखविला. ‘मणिपूर जळत असताना आपले पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण, त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थानात नाही. मी तेथे गेलो, तेथील सुरक्षा छावणीत महिला, बालकांसोबत चर्चा केली. त्यांच्या छळाचे अनुभव ऐकून मी हादरून गेलो आहे. आपले लष्कर मणिपुरात एका दिवसांत शांतता प्रस्थापित करू शकते, पणे मोदीजी तसे करत नाहीत. कारण, आपण हिंदुस्थानात मणिपूरला मारू इच्छित आहात. आपण भारत मातेचे राखणदार नाही तर हत्यारे आहात’, असा घणाघाती आरोपही राहुल गांधी यांनी केला. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘भारत माता आमची आई आहे, संसदेत बोलताना मर्यादा पाळा’, असा सल्ला राहुल गांधी यांना देताच, राहुल गांधी म्हणाले, ‘मीदेखील माझ्याच आईबद्दल बोलत आहे. भारतमाता माझीही आई आहे. मणिपूरमध्ये माझ्या भारत मातेची हत्या झाली आहे. सरकार मणिपूरमध्ये लष्कर पाठवून शांतता का प्रस्थापित करत नाही? कारण, आपण मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करत आहात’, असे जोरदार टीकास्त्र राहुल गांधी यांनी डागले.

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!