वर्धा (प्रकाश कथले) – भारत हा विविधांगाने नटलेला देश सुंदरच आहे. पण प्रगतीच्या नावाने अलीकडे वाढलेला वरपांगीपणा वेदनादायी आहे, अशी खंत देशातील सर्व संगीतज्ज्ञांना रसिकांसोबत जोडत त्यांना अभिजात संगिताच्या श्रवणतृप्तीचा आनंद देणार्या `स्पिक मॅके` संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ.किरण सेठ यांनी व्यक्त केली.
मागील वर्षापासून त्यांनी श्रीनगर येथून वयाच्या ७६ व्या वर्षी देशांतील नागरिकांसह युवकांसोबत संवाद साधण्यास सायकल यात्रा सुरू केली.खादीच्या मोजक्याच कपड्यांसह किडकिडीत देहयष्टीचा महापुरुष जनसंवादाच्या ध्यासाने देशभर एकटाच सायकलने भ्रमण करीत आहे.गांधीजींच्या विचार संस्कारातून ही निर्भिडता आल्याचे त्यांनी सांगितले.एरव्ही दररोज ते सायकलने ४५ किलोमीटरचा प्रवास करतात.पण ऑगस्ट क्रांतिदिनी वर्ध्यात पोहोचण्याचा ध्यास लागल्याने आज त्यांनी ६४ किलोमीटर सायकल प्रवास केला.ते थेट वर्ध्यातील मगनसंग्रहालयाच्या आवारातील विस्तीर्ण वटवृक्षाच्या छायेत निवांत बसले आणि येथेच त्यांनी मन मोकळे केले. संगीताशिवाय जीवनात आनंदच नाही, असे डॉ.किरण सेठ म्हणाले. संगीत साधनेसोबत विद्यार्थ्यांना जोडा,त्यांना अभिजात संगिताचा अनुभव घेऊ द्या,त्यांची एकदा संगितासोबत तार जुळली की मग त्यांच्यातील प्रगतीच्या वाटचालीचा बदल अनुभवा,संगितातून प्रेरणा मिळते,त्याचा अंत नाही,त्यातून एकाग्रता वाढून आत्मविश्वास दुणावतो,याचा अनुभव घेतल्यानंतरच मी स्पीक मॅकेची स्थापना केली.देशातील सर्व नामवंत वाद्य तसेच कंठ संगितज्ज्ञ संस्थेसोबत जुळले आहेत.त्यांच्या कार्यक्रमांचे आम्ही देशातील, विदेशातील रसिकांकरीता विनामूल्य आयोजन करतो,हे सांगतानाच त्यांची अभिजात संगितासोबतची जुळवणीही सांगितली. खडगपूरच्या आयटीआयमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली.त्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी केली.१९७४ मध्ये ते अमेरिकेत होते.१९७६ मध्ये भारतात परत आले. कोलंबिया येथे असताना त्यांनी अमिनुद्दीन डागर,फईदुद्दीन डागर यांचे धृपद धमार गायन ऐकले.मनाच्या आंतरिक तारा छेडल्या गेल्या.वेगळी एकाग्रता,उर्जेची अनुभूती जाणविली, त्यानंतर नवीन पिढीच्या उभारणीचा त्यांनी ध्यास घेतला.युवकांच्या मनातील एकाग्रता,आत्मविश्वास वाढविण्याकरीता त्यांना अभिजात संगितासोबत जुळविण्याची गरज असल्याचे ध्येय ठरवून त्यांनी `सोसायटी फॉर दी प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अॅण्ड़ कल्चर अमॉन्ग यूथ`,या `स्पीक मॅके` संघटनेची १९७७ मध्ये स्थापना केली.दरवर्षी किमान ५ हजार अभिजात संगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन स्पीकमॅकेच्या वतीने देशात केले जातात.या संस्थेचा जनक आज बापूंच्या नगरीत मुक्कामी होता.
संगीत साधनाध्यासातून,श्रवणातून जीवनातील त्रागा संपतो,प्रगतीच्या वाटचालीचा धागा जोडला जातो,हे स्पष्ट करतानाच त्यांनी महान तत्त्ववेत्ता आईनस्टाईन व्हायोलिन वाजवायचा,डॉ.सी.व्ही.रमण यांनी सरस्वती विणेवर संशोधन केले होते.माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम सरस्वती विणा वादनात रमायचे,अशी विविध उदाहरणे दिली. भारतरत्न भीमसेन जोशी,ग्वाल्हेर गायकीचा बुलंद आवाज डॉ.कृष्णराव शंकर पंडित,उस्ताद बिसमिल्लाखान,पं.रविशंकर,उस्ताद अल्लारखाँ साहेब यांच्यासह विविध दिग्गजांच्या आठवणींचा पेटाराच खुला केला.युवकाच्या विकासाकरीता ध्यासावलेल्या ध्येयवेड्या तपस्वीच्या आठवणींची मैफिलच विस्तीर्ण वटवृक्षाच्या छायेत रंगली होती.