शिक्षण विभागातील नोकरी घोटाळ्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना अखेर अटक
पुणे (सोनिया नागरे) – डीएड (शिक्षणशास्त्र पदविका) झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी १२ लाख तर बी.एड. झालेल्या उमेदवारांकडून १४ लाख रुपये उकळल्याप्रकरणी आरोपी असलेल्या राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत हे पैसे घेत होत्या. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, दराडे यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालवली होती.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त असलेल्या शैलजा दराडे यांना या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने निलंबीत केलेले आहे. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत, नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता शैलजा दराडे यांना अटक केली. या प्रकरणात दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्याला अटक करण्यात आलेली आहे. या दोघा बहीण-भावांनी शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी १२ ते १५ लाख रुपये घेऊन ४४ उमेदवारांची फसवणूक केल्याचे याप्रकरणात दाखल पोलिस तक्रारीत नमूद आहे. राज्य शिक्षण परिषदेच्या दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली होती. फसवणुकीचे हे प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होते. डी .एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी १२ लाख तर बी. एड. झालेल्या उमेदवारांकडून १४ लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या, असा आरोप आहे.
याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरी पाहिजे होती. जून २०१९ मध्ये सूर्यवंशी यांची भेट आरोपी दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगितले. आरोपी दादासाहेबने त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसरमध्ये २७ लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ५ कोटींची फसवणूक झालेली आहे. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शैलजा दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भ्रष्टांच्या जागेवर भ्रष्टच!
काही महिन्यांपूर्वी राज्य शिक्षण परीषदेच्या दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर त्या जागेवर शैलजा दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. पण स्वतः दराडे देखील भ्रष्टच निघाल्याने आता नवी नियुक्ती करताना सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.