BULDHANAHead linesVidharbha

रविकांत तुपकरांनी काढली पालकमंत्र्यांची खरडपट्टी!

– तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल!
– शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना रविकांत तुपकरांच्या भेटी, शेतकर्‍यांना दिला धीर!

संग्रामपूर/शेगाव (जिल्हा प्रतिनिधी) – संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर या तालुक्यांत अतिवृष्टीमुळे व ढगफुटीसदृश पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, जीवित व मालमत्तांची मोठी हानी झाली आहे. जिल्हा संकटात सापडला असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील हे इकडे फिरकलेही नाहीत. पालकमंत्र्यांची बेपर्वाही निषेधार्ह आहे. नुकसान होवून ४८ तास झाले तरी पालकमंत्री पाटील यांनी साधी पाहणीसुद्धा केली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे. सध्याची बिकट परिस्थिती पाहता, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा सरकारला या नुकसानग्रस्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा खणखणीत इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

रविकांत तुपकरांनी आज (दि.२३) शेगाव व संग्रामपूर तालुक्यातील कालखेड फाटा, पहूरपूर्णा, अकोला फाटा, दुर्गादैत्य, काथरखेड, पिंप्री, एकलारा, बावनबिर, निवाना, चांगेफळ, अकोली, रूधाना, वकाना यांसह अन्य गावात भेटी देवून पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. तसेच संग्रामपूर तहसीलदार योगेश्वरी टोपे यांची भेट घेत लवकरात लवकर पंचनामे करण्यासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना तुपकरांनी पालकमंत्र्यांच्या बेपर्वाई प्रवृत्तीवर सडकून टीका केली. जिल्ह्यातील घाटाखालील भागात पावसाने कहर केला आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे भीषण पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात अंदाजे तब्बल एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही पालकमंत्री इकडे फिरकत नाही, ही संतापजनक बाब आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अन्यथा आम्ही शेतकरीप्रश्नी लढण्यासाठी सज्ज आहोत, असा दमही त्यांनी सरकारला भरला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मेलद्वारे निवेदनदेखील पाठवले आहे.
अचानक आलेल्या पूरामुळे अनेक ठिकाणी घरे वाहून गेली आहेत, पशूधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके पाण्यात गेली तर शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. अनेकांच्या घरात पाणी घुसले, घरांची पडझड झाली. घरातील साहित्य वाहून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी या पूरात वाहून गेली आहे. प्रचंड असे नुकसान झाल्याने लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रविकांत तुपकरांनी या अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला. एकलारा येथील मुधकर पांडुरंग धुळे यांचा पुरात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला. रविकांत तुपकर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. ज्यांची घरे वाहून गेली, घरात पाणी शिरल्याने त्यांना शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे, अशा नागरिकांशीदेखील रविकांत तुपकर यांनी संवाद साधून त्यांना आधार दिला.
यावेळी प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी व तालुका पातळीवरील अधिकार्‍यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याची विनंती त्यांना केली. नागरिकांशी संवाद साधतांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोठे व आक्रमक आंदोलन उभे करण्याचा शब्द रविकांत तुपकरांनी दिला. संग्रामपूर व जळगाव जामोद ही दोन तालुके मिळूण एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यातील १२ हजार २५५ हेक्टर जमीन अक्षरश: खरडून गेली आहे. त्यामुळे शासनाने या सर्व शेतकर्‍यांना आता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. यावेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, नाना पाटील, सुनील अस्वार, दत्ता जेऊघाले, नयन इंगळे, समाधान म्हसुरकार, आशिष सावळे, शेख अस्लम, अमर राहटे, विवेक राऊत, प्रशांत खोडे, योगेश मुरुख, उज्वल खराटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!